नाशिक : मुथूट फायनान्सच्या कार्यालयावर दरोडा टाकण्याच्या हेतूने आलेल्या पाच संशयित सशस्त्र दरोडेखोरांपैकी दोघांना बेड्या ठोकण्यास नाशिक पोलिसांना यश आले आहे. मंगळवारी मध्यरात्री सुरतमधील एका वस्तीत राहणारा संशयित परमेंदर सिंग यास पोलिसांच्या पथकाने बेड्या ठोकल्या. साजू सॅम्युअल या धाडसी कर्मचाऱ्याचा प्रतिकार रोखण्यासाठी तीन गोळ्या झाडून त्यास ठार मारल्याची कबुली परमेंदर सिंग याने दिल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.शुक्रवारी (दि.१४) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास पाच दरोडेखोरांच्या टोळीने मुथूट फायनान्सच्या उंटवाडी कार्यालयावर दरोडा टाकत कोट्यवधींचे सोने लुटण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा हा प्रयत्न मुथूटचा धाडसी अभियंता साजू सॅम्युअलने हाणून पाडला. सॅम्युअलने शौर्याने दरोडेखोरांचा मुकाबला केला. आपत्कालीन अलार्म वाजवून नागरिकांची मदत घेण्याचा प्रयत्न केला, मात्र बिथरलेल्या दरोडेखोरांनी काही तरी अनपेक्षित असे घडत असल्याचे बघून कट उधळला जाऊ शकतो या भीतीपोटी परमेंदरने हातातील पिस्तूलने सॅम्युअलवर तीन गोळ्या झाडल्या आणि सॅम्युअल रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. यानंतर त्याचा दुसरा साथीदार कुख्यात गुंड आकाशसिंग राजपूत यानेही सॅम्युअलवर दोन गोळ्या झाडल्या. यानंतर दरोडेखोरांची टोळी कार्यालयातून पल्सर दुचाकींवरून फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरोडेखोरांच्या टोळीला सातपूर श्रमिकनगर भागात राहणा-या सुभाष गौड या मूळ उत्तर प्रदेशच्या संशयित गुन्हेगाराने दिलेला पाठिंब्यामुळे या कुख्यात गुंडांच्या टोळीने मुथूट फायनान्सचे उंटवाडी येथील कार्यालय निवडल्याचे तपासात पुढे आले आहे. परमेंदर हा उत्तर प्रदेशमधील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर उत्तर प्रदेश, बिहार राज्यांमध्ये १२ ते १५ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये दरोडा, प्राणघातक हल्ल्यांचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.---गौरव नावाने कार्यालयाची ‘रेकी’परमेंदर हा सातपूर श्रमिकनगर भागात दरोड्याच्या अगोदर सुमारे दहा दिवसांपासून वास्तव्यास होता. त्याने उंटवाडी येथील मुथूट फायनान्सच्या कार्यालयात दोन ते तीन वेळा ‘गौरव’ नावाने ये-जा करून रेकी केली होती. कार्यालयातील कर्मचारी संख्या, सुरक्षाव्यवस्था या सगळ्या बाबींचा आढावा त्याने घेत त्याच्या साथीदारांना आखलेला कट तडीस नेण्यासाठी मोठी मदत केल्याचे पोलिसांनी सांगितले.