नाशिक : गुंतवणुकीवर कमी वेळेत दामदुप्पट देण्याचे आमिष दाखवून कोपरगाव येथील २१ गुंतवणूकदारांना सुमारे दोन कोटी रुपयांना गंडा घालणाºया व्हिनस कॅपिटल सर्व्हिसेस या कंपनीच्या तिघा भामट्यांनी निफाड तालुक्यातील विंचूर येथील शेतकºयाचीही सुमारे ५६ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना ताजी असतानाच आता याच कंपनीचे नाव बदलून नाशकातील द्वारका चौकात ‘सक्सेस ट्री’ या नावाने नवीन शाखा उघडून गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा केले जात असल्याची तक्रार पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गुंतवणूकदारांना गंडा घालणाºया या टोळीच्या विरोधात तक्रार करणाºया तरुणीलाच भ्रमणध्वनीवरून धमकविण्याचा प्रकारही घडला आहे. कोपरगावच्या प्रेमराज काले टॉवरमधील पहिल्या मजल्यावर सन २०१६ मध्ये व्हिनस कॅपिटल सर्व्हिसेस कंपनी उघडून गुंतवणुकीवर कमी वेळेत दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून कंपनीचे संचालक प्रवीण शंकरराव वरगुडे, राजेंद्र सुकदेव जेजूरकर, दिगंबर जानकीदास बैरागी यांनी लोकांना आकर्षित केले. गुंतवणुकीतून कोपरगाव शहरात मोक्याच्या जागा घेतल्याचे दाखवून अधिकाधिक लोकांना त्यापासून फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखविले व्हिनस कॅपिटलप्रमाणेच त्यांनी सुखसाई तालुका नागरी सहकारी पतसंस्था या नावानेही दुसरी कंपनी सुरू करून सहा महिन्यांत पैसे गोळा केले. गावातील सुमारे २७ लोकांनी २ ते २५ लाखांपर्यंतची गुंतवणूक केली व त्याच्या मोबदल्यात कंपनीने धनादेश दिले, परंतु धनादेश न वटल्याने गुंतवणूकदारांनी तगादा लावताच त्यांनी कंपनी बंद करून पोबारा केला. याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असाच प्रकार विंचूर येथील रवींद्र मल्हारी दरेकर (४२) यांच्याबाबत घडला आहे. त्यांनीदेखील ५४ लाख रुपयांची गुंतवणूक केली, परंतु मुदतीत कंपनी त्यांचा पैसा परत न करू शकल्याने दि. १२ फेब्रुवारी रोजी प्रवीण वरगुडे, राजेंद्र जेजूरकर, दिगंबर बैरागी यांच्याविरुद्ध लासलगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील गुंतवणूकदारांना गंडविल्यानंतर आता व्हिनस कॅपिटल कंपनीने नाव बदलून नाशिक शहरातील द्वारका येथे बोडके प्लाझा या इमारतीत ‘सक्सेस ट्री’ या नावाने कंपनी सुरू केल्याची तक्रार सौ. अस्मिता प्रमोद देशमाने यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. या कंपनीकडून नागरिकांची फसवणूक केली जात असून, त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही सौ. देशमाने यांनी केली आहे.
दामदुपटीचे आमिष : कोपरगाव, लासलगावी गुन्हा दाखल फसवणूक करणाऱ्या कंपनीचे नाशिकमध्येही कार्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 12:24 AM