खरीप हंगामात कपाशीवर बोंडअळी आणि मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी कृषी विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. या अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून येवला तालुक्यातील खामगाव येथे कृषी विभागाच्या वतीने कापूस शेतीशाळा अंतर्गत कार्यशाळेचेआयोजन करण्यात आले होते. मागील हंगामात तालुक्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला. कपाशीखाली असलेल्या क्षेत्रापैकी बहुतांश क्षेत्र बाधित झाल्याचे दिसून आले. यंदा मात्र या बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी कृषी विभागाने तयारी केली आहे. यासाठी शेतकऱ्यांचे गट तयार करण्यात येऊन त्यांना बोंडअळी, तसेच लष्करी अळीचा प्रादुर्भाव कसा रोखावा, काय उपाययोजना कराव्यात याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. याप्रसंगी स्नेहालयाचे कृषिमित्र मापारी, कैलास भड, तालुका कृषी पर्यवेक्षक भाऊसाहेब पाटोळे, कृषी सहायक जी. ए. गिरी यांनी शेतकºयांना मार्गदर्शन केले. या शेतीशाळा वर्गाला परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खामगाव येथे बोंडअळी नियंत्रण कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 6:01 PM