सिन्नर : डॉक्टरांनी सांगितले आठ-दहा तास दवाखान्यात लवकर आलात म्हणून बरे झाले. त्यामुळे आता मिळालेले आयुष्य बोनस आहे. बोनस आयुष्य जनतेची अश्रू पुसण्यासाठी घालविणार असल्याचे भावनिक उद्गार राष्टवादी कॉँग्रेसचे नेते व आमदार छगन भुजबळ यांनी काढले. दवाखान्यातील दव्यासोबतच जनतेची दुआही कामी आल्याचे ते म्हणाले. शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन करून आल्यानंतर भुजबळ सिन्नरकडे येत असताना नाशिक-अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर वावी येथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. समता परिषद, राष्टÑवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पगडी घालून व पुष्पहार घालून त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी वावीकरांच्या आग्रहाखातर त्यांनी संवाद साधून आपण यापुढे लढणार व झगडणार असून, तेच प्रेम आणि साथ यापुढेही द्या, असे आवाहन त्यांनी केले. वावी येथे भुजबळांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी उसळली होती. यावेळी आमदार राजाभाऊ वाजे, शिवसेना युवा नेते उदय सांगळे, नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष शैलेश नाईक, राष्टÑवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, राजाराम मुरकुटे, राष्टÑवादी डॉक्टर्स सेलचे डॉ. विष्णू अत्रे, गोविंद लोखंडे, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, उपसरपंच विजय काटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीजवळ भुजबळ यांचे स्टाईसकडून स्वागत करण्यात आले. स्टाईसचे अध्यक्ष अविनाश तांबे यांच्यासह संचालक मंडळाने त्यांचे स्वागत केले. त्यानंतर कुंदेवाडी फाट्यापासून दुचाकी रॅली काढून भुजबळ यांचे सिन्नरनगरीत स्वागत करण्यात आले. वावी वेस भागातही भुजबळ यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी उसळली होती. त्यानंतर पंचवटी हॉटेलजवळ समर्थकांनी भुजबळ यांचे जंगी स्वागत केले.
बोनस आयुष्य जनतेचे अश्रू पुसण्यासाठी : छगन भुजबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 1:01 AM