लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी प्रकाशकांसाठी पुस्तक विक्रीसाठी भव्य पुस्तक स्टॉल दालनाची निर्मिती करण्यात आली आहे.
अधिकाधिक वाचकांपर्यंत हे ग्रंथदालन पोहोचावे आणि वाचन संस्कृतीत वृद्धी व्हावी, यासाठी संयोजन समिती प्रयत्न करीत आहे. ज्या प्रकाशकांना या साहित्य संमेलनात पुस्तकाचे स्टॉल लावायचे असतील त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक यांच्याकडे नावनोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करणाऱ्या स्टॉलधारकांना २५ मार्चला ग्रंथदालनाचे वितरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अन्य गोष्टींसाठी स्टॉल उपलब्ध होणार आहेत. उत्तर महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचे दर्शन व्हावे, यासाठी संयोजन समिती प्रयत्नशील आहे. विविध बचत गट या ठिकाणी स्टाॅल लावू शकतात. एकापेक्षा अधिक स्टॉल संयोजन समिती उपलब्ध करून देणार आहे, तरी अधिकाधिक प्रकाशक, पुस्तक विक्रेते तसेच अन्य स्टॉल लावू शकणाऱ्या व्यक्ती व संस्था यांनी आपली नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.