नाशिक : सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत मिळणारी पुस्तके बंद करून त्याऐवजी पुस्तकांसाठी खात्यावर रक्कम जमा करण्याच्या निर्णयाला कॉँग्रेस सेवा दलाने विरोध केला आहे. बॅँकेत खाते काढल्यास किमान तीन हजार रुपयांची शिल्लक ठेवावी लागते, अशावेळी गरीब विद्यार्थ्यांना खाते काढणे कसे परवडणार? असा प्रश्न सेवा दलाने केला आहे. शासनाच्या सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत शाळेतच मोफत पुस्तकं दिली जातात परंतु आता राज्य शासनाने मोफत पुस्तके देण्याऐवजी नवीनच कल्पना आणली आहे. त्यानुसार आता शाळांमध्ये पुस्तके न देता नियमितपणे पुस्तकांच्या दुकानातून घ्यावी लागतील आणि त्या बदल्यात विद्यार्थ्यांच्या बॅँक खात्यावर रक्कम दिली जाणार आहे. परंतु हा निर्णय विद्यार्थ्यांच्या सोयीचा नसल्याचे कॉँग्रेस सेवा दलाचा विरोध आहे. यासंदर्भात शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांना निवेदन देण्यात आले आहे. कोणत्याही राष्टÑीयीकृत बॅँकेत खाते काढल्यास किमान तीन हजार रुपयांची शिल्लक खात्यावर ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे आर्थिक दुर्बल आणि दरिद्रीरेषेखालील विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याचीच शक्यता अधिक आहे. हा निर्णय बदलून सध्याप्रमाणे शाळेतूनच विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके द्यावीत, अशी मागणी सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर, अण्णा मोरे, ज्ञानेश्वर चव्हाण, गौरव पवार, भगवान अहेर, सोनू कागडा, मिलिंद देसले, अनिल बहोत, नीलेश बेग यांनी केली आहे.
पुस्तक खरेदीच्या निर्णयाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 12:16 AM