नाशिक : तब्बल १८१ वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणाऱ्या सार्वजनिक वाचनालयातील पुस्तकांचा देवघेव विभाग जागा आणि इतर मर्यादांमुळे काहीसा बंदिस्त झाला होता. कोरोनाला इष्टापत्ती मानून लाखे पुस्तकांचा समावेश असणाऱ्या पुस्तक देवघेव विभागाचे स्थलांतरण सावानाच्याच स्व. माधवराव लिमये सभागृहात करण्यात आल्याने सर्व सभासदांना आता देवघेव विभागात सर्वत्र फिरून लाखो पुस्तकांमधून स्वत:चे पुस्तक आपणच निवडण्याची मुभा नागरिकांना मिळू शकणार आहे.
पुस्तकांचा देवघेव विभाग ही सावानाची प्रमुख ओळख आहे. आजवर असणाऱ्या जागेच्या आणि इतर मर्यादांमुळे पुस्तकांसाठी वाचनालयात येणाऱ्या वाचकांना तेथील टेबलवर असणाऱ्या मोजक्याच पुस्तकांमधून निवड करणे किंवा ग्रंथपालांना सांगून पुस्तके मागावी लागत होती. त्यात असलेल्या मर्यादांची समस्या लक्षात घेऊन सावानाच्या कार्यकारी मंडळाने पूर्वीच घेतलेल्या या निर्णयाची आता अंमलबजावणी केली असल्याचे सावानाचे प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर यांनी सांगितले. या विभागासाठी दानशूर दाम्पत्य डॉ. विनायक आणि शोभा नेर्लीकर यांनी घोषित केलेल्या ११ लाख रुपयांपैकी ६ लाख रुपयांचा निधी दिला आहे. हा अद्ययावत देवघेव विभाग लवकरच वाचकांसाठी सुरू होणार आहे. त्यामध्ये ई-पुस्तकालयाचीही सुविधा राहणार असल्याचे जातेगावकर यांनी नमूद केले. यावेळी नाट्यगृह सचिव ॲड. अभिजित बगदे, अर्थसचिव उदयकुमार मुंगी, आदी उपस्थित होते.
इन्फो
७ लाख पानांचे डिजिटलायझेशन
संस्कृती मंत्रालयाच्या राष्ट्रीय पांडुलिपी मिशन या प्रकल्पांतर्गत सार्वजनिक वाचनालय नाशिकच्या १० हजार पोथ्यांच्या तब्बल ७ लाख पानांचे डिजिटलायझेशन पूर्ण करण्यात आले आहे. आतापर्यंत सुमारे ५० लाखांचे काम पूर्ण झाले असल्याचे ग्रंथसचिव देवदत्त जोशी यांनी सांगितले. त्याशिवाय सावानाची वेबसाइट तयार करण्याचे काम सुरू असून, संपूर्ण दस्तऐवज जतन करण्याचे काम सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. सावानात मुक्त विद्यापीठाचे बी.लिब. व एम.लिब. केंद्र असून संशोधन, डॉक्टरेट करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र दालन सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ. वेदश्री थिगळे यांनी सांगितले.
इन्फो
महिलांसाठी स्वतंत्र अभ्यासिका
जुन्या देवघेव विभागात मुक्तद्वार विभाग व महिलांसाठी अद्ययावत अभ्यासिका सुरू करण्यात येणार आहे. बालविभागामार्फत नवीन पिढी तयार करण्याचे काम सुरू आहे. तसेच शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाणार आहे. तसेच बालभवनच्या माध्यमातून पुढच्या पिढीपर्यंत वाचन संस्कृती वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे कार्याध्यक्ष संजय करंजकर यांनी सांगितले. त्याशिवाय लायब्ररी ऑन व्हील या प्रकल्पासही लवकरच चालना देण्यात येणार असल्याचे ॲड. भानुदास शौचे यांनी सांगितले. कोरोना संदर्भातील नियमावली शिथिल होताच परवानगी मिळाल्यानंतर या वाचनालयाची गाडी गावात फिरती ठेवून पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचवली जाणार असून, तिथेच ती पुस्तके बदलता येणार असल्याचे शौचे यांनी नमूद केले.
इन्फो
पाठक, गांगल यांची भेट
सावानाचे माजी उपाध्यक्ष कै. किशोर पाठक यांचे चिरंजीव प्रथमेश पाठक यांनी त्यांच्याजवळ मोठ्या प्रमाणात असलेली ग्रंथसंपदा देणगी म्हणून दिली आहे. तसेच श्रीमती गांगल या आजींनी दररोज सहा तास याप्रमाणे प्रदीर्घ काळ स्वतः हाताने लिहिलेले अनेक धर्मग्रंथ येत्या शनिवारी सावानास देणगी रूपाने देण्यात येणार असल्याचेही ग्रंथसचिव जोशी यांनी सांगितले.
फोटो
२४सावाना देवघेव विभाग