नाशिक : दिवाळी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेली असताना बाजारात सगळीकडे लगबग पहायला मिळत असून आॅटोमोबाईल क्षेत्रातही दिवाळीच्या निमित्ताने नवचैतन्य संचारले आहे. सर्वच प्रमुख वाहन कंपन्यांनी दिवाळी बाजारपेठ काबिज करण्यासाठी विविध आकर्षक सवलती जाहीर केल्या असून आॅनलाईन व्यावहार करणाऱ्या ग्राहकांसाठी बँकांनी भरघोस कॅशबँकच्या सवलती दिल्या आहेत. त्यामुळे ग्राहक यासंधीचा फायदा घेण्यासाठी दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या शोरुम्समध्ये गर्दी करून आपल्या पसंतीचे वाहन आवडीच्या रंगामध्ये मिळण्यासाठी आतापासूनच बुकींग करताना दिसून दिसून येत आहेत.
दिवाळीत धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज या चार मुहूर्तांवर आपली मनपसंत कार किंवा मोटारसायकलच्या बुकिंगसाठी ग्राहकांनी शहरातील वेगवेगळ््या शोरुम्समध्ये गर्दी केली आहे. शहरात दसऱ्याच्या दिवळी जवळपास एक हजारवर चारचाकी आणि दीड ते दोन हजार दुचाकींची विक्री झाली होती. हा अकडा वाढण्याची शक्यता असून दिवाळीत चार दिवसांमध्ये किमान पंधराशेहून अधिक चारचाकी व तीन हजारपर्यंत दुचाकींची विक्री होण्याचा अंदाज वाहनबाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे वितरक ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन बुकींग झालेली वाहन तयार करून मागणीनुसार अॅक्सेसरीज करून ठेवण्याच्या प्रयत्नात आहे.
दिवाळीच्या मुहूर्तावर अनेकजण आपले नवे वाहन घरी नेण्याच्या तयारीत असून गेल्या १५ दिवसांपासून बुकींग सुरू आहे. काही गाड्या उपलब्ध होत नसल्याने ग्राहक बुकींग करून प्रतिक्षेत आहे. तर अनेकजण अजूनही बुकींग करीत आहेत. दिवाळीपूर्वी बुकींग करणाऱ्या ग्राहकांना मूहूर्तावर गाडी उपलब्ध होईल. ऐनवेळी कार खरेदी करणारे ग्राहक कमी असले तरी त्यांनाही वाहन उपलब्ध करून देण्याचा वितरकांचा प्रयत्न आहे. राजेश कमोद, सीईओ, सेवा
सुलभ कर्जामुळे वाहन खरेदीत वाढवाहन खरेदी करण्यासाठी येणारी आर्थिक अडचण दूर करण्यासाठी अर्थसहाय्य करणाऱ्या विविध कंपन्यांचे प्रतिनिधी शोरुममध्ये अवघ्या १० ते १५ मिनिटात आॅनलाईन कर्ज मंजूर करून देतात. त्यामुळे कमीत कमी डाउन पेमेंट आणि जवळापास १०० टक्के कर्ज मिळत असल्याने ग्राहकांकडून आवडती स्कूटर, मोटारसायकलसोबतच चाकचाकी वाहन खरेदीला पसंती मिळत आहे.