सिन्नर : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील बोरखिंड धरण दरवर्षीपेक्षा सुमारे महिनाभराच्या विलंबाने का होईना, भरून ओव्हरफ्लो झाले आहे. सुमारे ५५ दशलक्ष घनफूट क्षमतेचे बोरखिंड धरण रविवारी दुपारी ओव्हरफ्लो झाले. तालुक्याच्या पश्चिम भागातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ओंढेवाडी डोंगर पट्ट्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरण ओव्हरफ्लो होऊन पाणी दारणा नदीला जाऊन मिळाले. दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यात ओव्हरफ्लो झालेले तालुक्यातील हे पहिलेच धरण ठरले आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातच पावसाने सरासरी ओलांडली आणि १५ ऑगस्टपूर्वी बोरखिंड धरण ओव्हरफ्लो झाले होते. यंदा धरण भरण्यास तब्बल एक महिना उशीर झाला. या धरणावर बोरखिंड, घोरवड आणि शिवडा येथील पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. परिसरातील सुमारे शंभर ते दीडशे हेक्टर शेतीला धरणातील पाण्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या सिंचनाचा लाभ होत असल्याची माहिती बोरखिंडचे सरपंच गणेश कर्मे यांनी दिली. त्यामुळे धरण भरल्याने या तिन्ही गावांतील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान, सरदवाडी, कोनांबे या दोन धरणांमध्ये पाण्याची काही प्रमाणात आवक झाल्याने जिवंत पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे, तर भोजापूर धरणात अवघा २४ टक्के इतका पाणीसाठा आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम असल्याने म्हाळुंगी नदी जोरदार प्रवाही न झाल्याने संततधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
---------------------
सिन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील ओव्हरफ्लो झालेले बोरखिंड धरण. (१४ सिन्नर बोरखिंड)
140921\14nsk_25_14092021_13.jpg
१४ सिन्नर बोरखिंड