सटाणा : संपूर्ण कसमादे परिसराचे लक्ष लागून असलेल्या एचडीएफसी बँकेच्या सटाणा शाखेतील कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी सटाणा न्यायालयाने दोन्ही संशयित आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले आहेत. एचडीएफसी बँकेकडून सटाणा पोलिसांत रीतसर तक्रार दाखल करूनही पोलिसांनी इतक्या गंभीर गुन्ह्याबाबत एफआयआर दाखल न केल्याने सटाणा न्यायालयाने पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत.
दरम्यान, पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली असून त्यांना सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मंगळवारी (दि.९) सायंकाळी उशिरा सटाणा न्यायालयाने एचडीएफसी बँकेच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी दोन्ही संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करण्याचे आदेश पोलीस निरीक्षकांना दिले. त्यानंतर पोलीस निरीक्षक सुभाष अनमूलवार यांनी अखेर या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेत संशयित मनोज दिलीप मेधने (रा. सरस्वतीवाडी, ता. देवळा) व शरद शिवाजी आहेर (रा. सोयगाव ता. मालेगाव) यांना अटक केली. दोन्ही संशयितांना बुधवारी (दि.१०) दुपारी सटाणा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीश ए. एस. कोष्टी यांनी दोन्ही संशयितांना सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.सटाणा पोलीस ठाण्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे बँकेने रीतसर तक्रार करूनही पोलीस प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने एचडीएफसी बँक प्रशासनाने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. एचडीएफसी बँकेच्या सटाणा शाखेतील पीक कर्ज विभागातील दोन कर्मचाऱ्यांनी तब्बल १ कोटी ४ लाख ४५ हजार रुपये इतक्या रकमेचा अपहार केल्याची तक्रार बँकेने सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष अनमूलवार यांच्यासह उपविभागीय अधिकारी मालेगाव ग्रामीण, स्थानिक गुन्हे शाखा नाशिक, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्याकडे १९ सप्टेंबर २०२१ रोजी दिलेली होती. मात्र पोलिसांनी या अत्यंत गंभीर गुन्ह्याची कोणतीही दखल घेतली नाही किंवा चौकशीदेखील न केल्याने ही फिर्याद न्यायालयात दाखल करावी लागत असल्याचा उल्लेख एचडीएफसी बँकेचे वकील ए. के. पाचोरकर यांनी सटाणा न्यायालयात केलेल्या तक्रार अर्जात केल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.एचडीएफसी बँकेचे प्राधिकृत अधिकारी विशाल पठाडे यांनी वकिलांमार्फत न्यायालयात दाखल केलेल्या तक्रार अर्जात सदर गुन्ह्याचा सखोल तपास सटाणा पोलीस स्टेशन यांनी करण्यासाठी न्यायालयाने १५६(३) अन्वये आदेश करण्याची विनंती केली होती. दरम्यानच्या काळात न्यायालयाला सुट्टी असल्याने मंगळवारी (दि. ९) या प्रकरणी सटाणा न्यायालयात दोन्ही पक्षांनी आपापला युक्तिवाद न्यायालयासमोर केला असता न्यायाधीश ए. एस. कोष्टी यांनी सर्वोच्च न्यायालयाने २ जुलै २०१४ रोजी दिलेल्या अर्नेशकुमार विरुद्ध बिहार सरकार या केसमधील निकालाचा दाखला देत दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक करण्याचे आदेश पोलिसांना दिले. सोबतच शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असतानाही पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ केल्याने न्यायालयाने पोलीस प्रशासनाला फटकारले आहे.इन्फो३१ शेतकऱ्यांची फसवणूकगुन्ह्यातील बँक कर्मचारी संशयित मनोज दिलीप मेधने (रा. सरस्वतीवाडी, ता. देवळा) व शरद शिवाजी आहेर (रा. सोयगाव, ता. मालेगाव) यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून बँकेशी आर्थिक अनियमितता व बँकेच्या ग्राहकांना चुकीची माहिती देऊन खोटे व बनावट दस्तऐवज देत बँकेची व बँकेच्या ग्राहकांची फसवणूक होईल असे कृत्य केल्याचे बँकेने न्यायालयास निदर्शनास आणून दिले. बँकेच्या ग्राहकांकडून बेकायदेशीररीत्या रक्कम घेऊन सदर रकमेचा अपहार स्वतःच्या फायद्यासाठी केला असून, दोन्ही संशयितांनी केलेले कृत्य हे फसवेगिरी, विश्वासघात व बँकेच्या कायदेशीर कागदपत्रांच्या बनावट नकला तयार केल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून बँकेच्या नावलौकिकाला देखील यामुळे बाधा निर्माण झाली आहे. मुख्य सूत्रधार मनोज मेधने व त्याचा साथीदार यांनी नियोजनबद्ध पद्धतीने बागलाण तालुक्यातील तब्बल ३१ शेतकऱ्यांची व बँकेची १ करोड ४ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केली आहे.