नाशिक : आडगावकर- खान कुटुंबातील विवाहासंदर्भात निर्माण झालेल्या वाद-विवाद आणि माध्यमांवरील चर्चेनंतर गुरुवारी हा विवाहसोहळा निर्धारित खासगी हॉटेलमध्ये मोजक्याच नातेवाइकांच्या उपस्थितीत पार पडला. हिंदू व मुस्लीम अशा दोन्ही पद्धतीने हा विवाह लावण्यात आला.
या विवाहाची पत्रिका समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला हिंदू-मुस्लीम तसेच लव्ह जिहाद असा रंग देण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, दोन्ही कुटुंबीयांनी आपापल्या पाल्यांच्या हिताचा विचार करून या विवाहाला मान्यता दिली असल्याचे त्यांच्या पालकांनी जाहीर केले. तसेच महिनाभरापूर्वीच रजिस्टर पद्धतीने विवाह झाला असल्याचेही नमूद करण्यात आले होते. दरम्यान गत आठवड्यात राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आडगावकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन या विवाहाला कुणीही अडथळा न करण्याचे आवाहन केले होते. गत आठवड्यातील या घटनेनंतरही काही नागरिकांनी आमच्या समाजाच्या प्रश्नात हस्तक्षेप न करण्याचे आवाहन केल्याने विवाहाबाबत वेगवेगळी चर्चा सुरूच होती. अखेर गुरुवारी साध्या पद्धतीने हा विवाह सोहळा पार पाडण्यात आला. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्र सेवा दल व छात्रभारती यांचे कार्यकर्ते पाठिंब्यासाठी उपस्थित होते.
-----
कडू आले नाही विवाहाला
या विवाह सोहळ्यास उपस्थित राहणार असून कोण विवाह रोखतो, ते पाहतो, असे गत आठवड्यात बच्चू कडू यांनी जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात या विवाह साेहळ्यास ते उपस्थित राहू न शकल्याने त्याचीदेखील चर्चा झाली.
---
कोणत्याही प्रकारचा वादविवाद वाढू नये, यासाठीच मोजक्याच नातेवाइकांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला आहे. विवाहाचा निर्णय दोन्ही कुटुंबांनी मिळून घेतलेला असल्याने सर्व समाजाने योग्य भावनेतून त्याचा स्वीकार करावा.
-प्रसाद आडगावकर, कन्येचे वडील
----------
या आंतरधर्मीय विवाहाबाबत मोठीच चर्चा आणि वादही झाले. मुलीच्या जातीच्या जातपंचायतने तसेच काही धार्मिक संघटनांनी त्यास कडाडून विरोध केला होता. असे करणे म्हणजे जात पंचायतच्या सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याचा भंग आहे. हे लक्षात आणून दिल्यानंतर विरोध मावळून विवाह शांततेत पार पडला.
- कृष्णा चांदगुडे, कार्यवाह, अंनिस
---------------------
फोटो
२२विवाह