नाशिक रोड शिवजन्मोत्सव समितीचा शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचा वडनेर गावातील ओहळाजवळ लोखंडी पाइपच्या सांगाड्याला चिटकवून लावण्यात आलेला डिजिटल फलक गुरुवारी जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे खाली पडला होता. हा फलक लॅम्प रोड, सौभाग्यनगर येथील राज मंगेश पाळदे (२०) याला शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पाथर्डी फाट्याकडून दुचाकीवर विहीतगावच्या दिशेने येत असताना दिसला. त्यामुळे त्याने गाडी थांबवत त्या ठिकाणी उभ्या असलेल्या अक्षय उर्फ सनी किशोर जाधव (२६, रा. राजवाडा, वडनेर) याच्यासह राहुल पवार व आणखीन एका युवकाला आवाज मारून फलक उचलून पुन्हा लावण्यासाठी बोलाविले. ते चौघे जण लोखंडी साट्याला चिकटवलेला फलक उचलून पुन्हा उभा करीत असताना लोखंडी चौकट विद्युत वाहिनीच्या संपर्कात आल्याने त्यात विद्युत प्रवाह उतरून राज पाळदे व अक्षय जाधव यांना जोरदार विजेचा धक्का लागला. यात ते गंभीर जखमी झाले. तर राहुल पवार व त्याचा एक मित्र असे दोघे विजेच्या धक्क्याने फेकले गेल्याने किरकोळ जखमी झाले. हा प्रकार लक्षात येताच आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत राज पाळदे व अक्षय जाधव यांना तत्काळ महापालिकेच्या बिटको रुग्णालयात दाखल केले. मात्र, विजेच्या तीव्र धक्क्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
इन्फो-
वडनेर, सौभाग्यनगर परिसरावर शोककळा
विजेचा धक्का लागून राज पाळदे व अक्षय जाधवच्या मृत्यूची माहिती मिळताच वडनेर गावातील ग्रामस्थ, नगरसेवक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवप्रेमी यांनी बिटको रुग्णालयामध्ये गर्दी केली. या वेळी पाळदे व जाधव कुटुंबीयांचा टाहो पाहून उपस्थितांनाही भावना अनावर झाल्याने सर्वांचेच डोळे पाणावले. या दुर्दैवी घटनेमुळे वडनेर, विहितगाव, सौभाग्यनगर परिसरातील शिवजयंतीवरही शोककळा पसरली.
इन्फो -
एकुलता एक मुलगा गमावला
या अपघातात सौभाग्यनगर येथील पाळदे कुटुंबीयांनी त्यांचा एकुलता एक मुलगा गमावला आहे. राज पाळदे हा पाळदे कुटुंबातील एकुलता एक मुलगा असून त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे. राज हा डिप्लोमा इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत होता. तर आयटीआयचे शिक्षण घेतल्यानंतर फोटोग्राफीचा व्यवसाय करणारा अक्षय जाधव कुटुंबाचा आधार होता. त्याच्या पश्चात आई-वडील, दोन मोठे भाऊ असा परिवार आहे.
-(मृत्यू झालेल्या राज पाळदे व अक्षय जाधव या युवकांचे फोटो आर फोटोला सेव्ह आहेत)