किरण अग्रवाल
नाशिक महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात आला असताना जे चित्र दिसत आहे त्यानुसार, लढत मुख्यत्वे शिवसेना व भाजपा या दोघांतच होणे निश्चित आहे. राज ठाकरे यांच्या सभेने काहीअंशी मनसेच्याही जिवात जीव आला खरा; पण तसे असले तरी ‘स्वबळा’वर कुणा एकाला स्पष्ट बहुमत मिळवता येणे जिकिरीचेच असल्याने अंतिमत: सत्तास्थापनेच्या राजकीय कवायतीसाठी अपक्ष किंवा कुणा तिसऱ्याची गरज भासण्याचीच शक्यता अधिक दिसून येते आहे.
नाशिक महापालिका निवडणूक प्रचाराचे ढोल फाटेस्तोवर वाजवले जात असल्याने व परस्परांवरील आरोप-प्रत्यारोपाच्या टीकेने सर्वोच्च पातळी गाठल्याने यंदा शिवसेना व भाजपा या दोन पक्षात निकराची झुंज होणे निश्चित आहे. या दोघांच्या अटीतटीत महापालिकेतील विद्यमान सत्ताधारी ‘मनसे’सह अन्य सारेच पक्ष झाकोळून गेले असले तरी, राज ठाकरे यांच्या एकमात्र सभेने ‘मनसे’च्या अपेक्षा काहीशा उंचावून गेल्या आहेत. अर्थात पक्षीय उमेदवारांखेरीज व्यक्तिगत प्रभावातून म्हणा अगर बाहुबलींच्या मतविभागणीतून, जे अपक्ष उमेदवार मैदान मारण्यात यशस्वी होतील; तेच या स्थितीत सत्तास्थापणाऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरलेत तर आश्चर्य वाटून घेता येऊ नये.महापालिका निवडणुकीची चुरस शिगेला पोहोचली असून, केंद्र व राज्यात सत्तासोबती राहूनही एकमेकांची औकात काढण्यापर्यंत शिवसेना व भाजपाची मजल गेल्याने या चुरशीत यंदा टोकाच्या वितुष्टाची भर पडून गेली आहे. मुंबई महापालिकेवर सत्ता कुणाची, या मूळ मुद्द्यावरून शिवसेना व भाजपा या दोन्ही पक्षात बिनसले असले, तरी या दोघांना तशीही स्वबळाची स्वप्ने पूर्वीपासूनच पडत होती. गेल्यावेळी ते बळ दोघांनीही अजमावून झाले असल्याने यंदा पुन्हा त्याच मार्गाने जाण्याची मानसिकता या पक्षात होती. त्यामुळे नाशकातील पक्ष पदाधिकारी त्यादृष्टीने अगोदरपासूनच कामास लागले होते. त्याची सुरुवात पक्षातील ‘भरती’पासून केली गेली. यात शिवसेनेला सर्वाधिक पसंती राहिल्याने स्वाभाविकच निवडणुकीच्या वातावरण निर्मितीत हा पक्ष आघाडीवर होता. त्यापाठोपाठ ‘भाजपा’त भरती झाली. शिवसेनेशी झालेल्या ‘काडीमोडा’च्या पार्श्वभूमीवर भाजपाही त्वेषाने व ईर्षेने कामाला लागली होती. त्यातूनच काहीही करून सत्ता मिळवायचीच, या ध्यासातून भाजपाने आपले आजवरचे नीती-निकषांचे-तत्त्वांचे सोवळे सोडून काही गुंड प्रवृत्तीच्या उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरवले. त्यामुळे शिवसेना व भाजपातील संघर्ष अधिक टोकाचा होत गेला.महत्त्वाचे म्हणजे, शिवसेना-भाजपा या दोघांनी निवडणूक प्रचारात आघाडी घेतली असली तरी, या दोघांकडेही सर्वमान्य ठरू शकेल असे स्थानिक नेतृत्व नाही. भाजपाचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप व शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते या दोघांनाही उमेदवारी वाटपात राजकारण केल्याच्या आरोपाला सामोरे जावे लागले आहे. दोन्ही पक्षात उमेदवारी वाटपावरून ‘घमासान’ झाल्याचे व त्यातून ‘स्वकीय विरुद्ध परके अथवा आयात केलेले’ असे सलामीचे सामने रंगलेलेही पाहावयास मिळाले. तितकेच नव्हे, तर समाज माध्यमात ‘व्हायरल’ झालेल्या अर्थकारणाशी संबंधित व्हिडीओ क्लिप्समुळे भाजपा व गुंडपुंडानाही उमेदवारी दिल्याच्या मुद्द्यावरून भाजपासह शिवसेना हे दोन्ही पक्ष टीकेस पात्र ठरले. असे असताना या दोन्ही पक्षातच मुख्य लढत होताना दिसते आहे, कारण महापालिकेत सत्ताधारी असलेल्या ‘मनसे’सह काँग्रेस व राष्ट्रवादीसारख्या पक्षांना सक्षम पर्याय म्हणून आपली प्रतिमा निर्माण करता आली नाही. त्याउलट अस्मिता, स्वाभिमान व स्थानिक प्रश्नांवरील आक्रमकतेच्या मुद्द्यावर शिवसेना प्रबळपणे पुढे आलेली दिसत आहे तर केंद्र तसेच राज्यातील सत्तेच्या प्रभावाच्या अनुषंगाने आणि नाशकातून निवडून गेलेल्या पक्षाच्या तीन आमदारांच्या भरोशावर भाजपाने ‘स्वबळ’ सिद्ध करण्यासाठी धडपड चालविली आहे. शिवसेनेसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व भाजपाकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या जाहीर सभा झाल्याने प्रचारात रंग भरले गेले. गेल्या २०१२मधील महापालिकेच्या निवडणूक प्रचारात राज ठाकरे यांच्यासमोर छगन भुजबळ यांचे तगडे आव्हान होते, यंदा भुजबळ कारागृहात असल्याने ‘राष्ट्रवादी’चे अवसान गळाल्यासारखी स्थिती आहे. पक्षाचे काही उमेदवार व्यक्तिगत प्रभावातून निवडून येतीलही; परंतु राष्ट्रवादीचा पक्ष म्हणून निवडणुकीत जो प्रभाव दिसायला हवा होता तो दिसू शकलेला नाही. या स्थितीमुळेच राष्ट्रवादीला यंदा ‘बॅकफुट’वर जात त्यांच्यापेक्षाही अल्पजीवी असलेल्या काँग्रेसशी ‘आघाडी’ करायची वेळ आली. काँग्रेसच्या शहराध्यक्षांवरही भाजपा-सेनेच्या शहराध्यक्षांप्रमाणे उमेदवारी वाटपावरून अर्थकारणाचा व अन्य पक्षीयांशी हातमिळवणी केल्याचा आरोप झाला आहे. पक्षातील अन्यही कोणी साथ देईनासे चित्र आहे. त्यामुळे व्यक्तिकेंद्रित निकालाच्या जागा वा प्रभागवगळता राष्ट्रवादी व काँग्रेस या दोघांनीही जणू मैदानात उतरण्याआधीच ‘विकेट’ फेकून दिल्यासारखी स्थिती होती. प्रत्यक्ष प्रचारातही त्यांनी कुठे बाळसे धरल्याचे दिसून येऊ शकले नाही. यातही दुष्काळात तेरावा महिना म्हणायचा तो असा की, या पक्षांचे वरिष्ठ नेते आपापल्या ठिकाणच्या निवडणुकांत अडकून पडलेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे व काँग्रेससाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील अशा मोजक्या मान्यवरांचे अपवादवगळता जाहीर सभांनी वातावरण वा स्थिती बदलवू शकणारे नेते प्रचाराला लाभू शकले नाहीत. परिणामी ‘आघाडी’ असली तरी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना खऱ्याअर्थाने ‘स्वबळा’वर मतदारांसमोर जाण्याची वेळ आलेली आहे. काँग्रेससाठी धक्कादायी बाब म्हणजे, उठता-बसता पक्षनिष्ठेच्या बाता करणारे व त्याच कारणातून ऐन निवडणुकीच्या धामधुमीत पक्षाच्या शहराध्यक्षांविरुद्ध वरिष्ठांकडे लेखी तक्रार करणारे माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांचे पुत्र प्रीतिश हे चक्क उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभेत शिवसेनेची पायरी चढते झाले. यावरून काँग्रेसचे नेतेच कसे पराभूत मानसिकतेत वावरत आहेत, ते स्पष्ट व्हावे.राहता राहिला विषय ‘मनसे’चा, तर विद्यमान अवस्थेत हा पक्ष महापालिकेत सत्ताधारी असतानाही कालपर्यंत तसा निस्तेजावस्थेतच होता, आणि त्यामागचे कारण होते पक्ष सोडून गेलेले तब्बल ३० नगरसेवक. अगदी निवडणुकीच्या तोंडावर केल्या गेलेल्या काही कामांखेरीज गेल्या चार-साडेचार वर्षात ‘मनसे’च्या स्थानिक धुरिणांना जनमानसात आपल्या सत्तेचा कसलाही प्रभाव निर्माण करता आलेला नाही. अखेर खुद्द राज ठाकरे यांनी त्यासाठी उद्योगपतींशी असलेले आपले वैयक्तिक संबंध उपयोगात आणून नवनिर्माणाच्या काही खुणा उभारल्या, ज्याची माहिती त्यांनी मुंबई, ठाणे व पुण्यातील सभांमध्येही दिली. पण त्याहीपेक्षा विशेष असे की, अधिकृत प्रसिद्धीपूर्वीच व्हायरल झालेल्या नाशिकच्या शहर विकास नियंत्रण नियमावलीतील जाचक अटींवर राज ठाकरे यांनी अचुक बोट ठेवून भाजपाला आरोपीच्या पिंंजऱ्यात खेचलेच, शिवाय शिवसेना-भाजपाच्या प्रचाराचा उधळलेला वारू लक्षात घेता या दोन्ही पक्षांनी तब्बल ८८ गुंडांना उमेदवारी दिल्याचे सांगत व गुंडांच्या हाती सत्ता सोपविणार का, असा प्रश्न करीत यंदाच्या आपल्या एकमात्र सभेद्वारे निवडणुकीच्या रणांगणातील ‘मनसे’चे आव्हान अगदीच संपले नसल्याचे दर्शवून दिले आहे. अर्थात, ‘मनसे’सह काँग्रेस, राष्ट्रवादीचे असोत, की अगदी अपक्ष म्हणून निवडणूक लढविणारेही काहीजण; व्यक्तिगत प्रभावामुळे त्यांच्या विजयाची खात्री बाळगली जात आहे. तेच ‘निर्णायक’ भूमिकेत राहाण्याचीही शक्यता आहे. कारण शिवसेना व भाजपा सत्ता स्थापण्यासाठी आतुर झालेली असली तरी, कुणाच्या तरी कुबड्या घेतल्याखेरीज स्वप्नपूर्तीचा गुलाल कुणालाच उधळता येऊ नये असेच आजचे जनमानस आहे.