नाशिकरोड : केंद्र सरकारने कोरोनाचा लॉकडाउन कालावधी १७ मेपर्यंत वाढविल्याने नाशिकरोड येथील भारत प्रतिभूती मुद्रणालय व चलार्थपत्र मुद्रणालय १७ मेपर्यंत बंद राहील.भारतात २४ मार्चपासून ३ मेपर्यंत सरकारने दोन टप्प्यांत लॉकडाउन घोषित केले आहे. केंद्र सरकारने हा कालावधी १७ मेपर्यंत वाढविला. त्याला अनुसरून मजदूर संघ प्रतिनिधींची दोन्ही प्रेसच्या व्यवस्थापनबरोबर बैठक झाली. प्रेसमध्ये नाशिकरोडसह दूरच्या गावांमधून येणाऱ्या कामगारांची संख्या लक्षणीय आहे. त्यांना सर्वांना कामावर बोलावणे हे त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. प्रेसमध्ये एकत्रित काम करताना सर्वांच्याच आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. याबाबी व्यवस्थापनासमोर मांडण्यात आल्या. त्यानंतर सरकारच्या निर्देशाप्रमाणे दोन्ही प्रेस १७ मेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. अत्यंत गरजेच्या वेळी आवश्यक असलेले काम करून दिले जाईल. त्यासाठी गरजेप्रमाणे नियोजन केले जाईल.
नाशिकरोडचे दोन्ही प्रेस १७पर्यंत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2020 1:34 AM