नाशिक : परिसरातील विविध ठिकाणाहून दिवसा व रात्रीच्या सुमाराला किमती सायकल चोरून येणाऱ्या दोघा विधी संघर्षित बालकांना पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 33 हजार रुपये किमतीच्या 7 सायकल जप्त केल्या आहेत.
याबाबत माहिती अशी की, पंचवटी परिसरात गेल्या काही दिवसांपासून शालेय विद्यार्थी तसेच क्लासेसच्या ठिकाणाहून व राहत्या घरापासून सायकल चोरीच्या घटना वाढलेल्या होत्या. किंमती सायकल जात असल्याने सदरचे कृत्य विधी संघर्षित बालकांचे असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली होती. दोन दिवसांपूर्वी काही विधी संघर्षित बालक फुलेनगर येथे सायकल विक्रीसाठी आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना मिळाली.
या माहितीचा आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, हवालदार विलास बसते, सतीश वसावे, सचिन म्हसदे, भूषण रायते, दशरथ निंबाळकर, जितू जाधव आदींनी फुलेनगर परिसरात सापळा रचून दोघा विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी परिसरातील विविध ठिकाणाहून सायकल चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी या संशयितांकडून विविध कंपन्यांच्या 33 हजार रुपये किमतीच्या सात सायकल जप्त केल्या आहेत अजूनही विविध ठिकाणाहून चोरी केलेल्या सायकल संशयितांकडून मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.