सिडको : येथील उंटवाडीरोड परिसरातील वर्दळीच्या ठिकाणी गेल्या शुक्रवारी (दि.१४) मुथूट फायनान्सच्या कार्यालयात दरोडा टाकणाऱ्या दोघा संशयितांना गुन्हे शाखेच्या पाथर्डी फाटा येथील युनिट दोनच्या पथकाने ताब्यात घेतले असून, उर्वरित संशयितांचे धागेदोरे हाती लागल्याने त्यांच्या शोधासाठी बुधवारी दुपारनंतर पोलीस पथक रवाना झाले असल्याचे समजते.सिडकोतील उंटवाडीरोडवर असलेल्या मुथूट फायनान्स कंपनीच्या कार्यालयात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने शिरलेल्या चौघा दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात कार्यालयातील अभियंता साजू सॅम्युएल जागीच ठार झाला तर अन्य तिघे जखमी झाल्याची घटना घडली होती. अतिशय वर्दळीच्या ठिकाणी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास वेळी ही घटना घडून दरोडेखोर दुचाकीने आरामात निघून गेल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर शंका घेण्यात आली होती. शहरभर सर्वत्र नाकाबंदी करूनही दरोडेखोर पसार होण्यात यशस्वी झाले होते. तर दुसºया दिवशी पेठरोडवरील रामशेज शिवारात त्यांनी वापरलेल्या दुचाकी बेवारस सापडल्या होत्या.पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तसेच दुचाकीवरून दरोेडेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना ठोस सुगावा लागू शकला नसला तरी, पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासात सर्व शक्यतांची पडताळणी कायम ठेवली आहे. त्यातूनच मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अंबड लिंकरोडवरून दोघे जण संशयावरून ताब्यात घेतले आहेत.पोलीस रवानासंशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी दरोडाप्रकरणावर प्रकाशझोत टाकणारी बरीचशी माहिती दिल्याचे समजते. संशयितांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर अन्य संशयितांचा देखील शोध घेण्यासाठी बुधवारी दुपारीच पोलीस पथक रवाना झाली असून, परराज्यात पथके गेल्याचे समजते.पोलिसांना अन्य संशयितांचीही नावे, पत्ते आदी सर्व माहिती मिळाली असून, घटनेपूर्वी त्यांनी नाशकात काही दिवस मुक्काम करून मुथूट फायनान्सच्या कार्यालयाची रेकी केल्याचेही स्पष्ट झाले आहे. येत्या दोन दिवसांत या दरोड्याचा उलगडा होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
मुथूट दरोडाप्रकरणी दोघे संशयित ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 1:22 AM