---
नाशिक : कोरोनाच्या उपचारादरम्यान वापरले जाणारे टोसिलुझुमॅब हे अत्यावश्यक वर्गातील समाविष्ट इंजेक्शन अतिचढ्या दरात विक्री करताना पोलिसांच्या सापळ्यात अडकलेल्या त्या दोघा संशयितांना जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यांचे दोघे साथीदार अद्यापही फरार आहे.
अत्यावश्यक गटात समाविष्ट असलेल्या औषधांपैकी एक ‘टोसिलुझुमॅब’ या इंजेक्शनचा काळाबाजार करताना गंगापूररोड परिसरात दोघाना गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने बुधवारी दुपारी बेड्या ठोकल्या. संशयितांच्या ताब्यातून एक इंजेक्शनची बाटली जप्त करण्यात आली आहे. कोरोनाबधित झालेल्या नातेवाइकाच्या उपचारासाठी आणलेल्या इंजेक्शनपैकी उरलेले एक इंजेक्शन संशयित संशयित प्रणव केशव शिंदे (२४, लक्ष्मणरेखा सोसायटी, पंचवटी), संकेत अशोक सावंत (२५, रा.न्यू तेजश्री अपार्टमेंट, मखमलाबाद नाका) हे सुमारे २ लाख ६० हजार रुपये इतक्या किमतीत विकण्याच्या तयारीत होते. पोलिसांना याची कुणकुण लागल्याने त्यांचा हा डाव उधळला गेला. त्यांच्याविरुद्ध गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत अन्न औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक सुरेश साहेबराव देशमुख (४५) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांना गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायालयात पोलिसांनी हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यांच्या उर्वरित दोघा साथीदारांचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे पुढे आला आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहे. प्रणव हा एका फार्मसी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.