नाशिक : गणेश विसर्जन मिरवणुकीत तलवार बाळगून आपापसात भांडण करीत उपद्रव माजविण्याचा प्रयत्न करणाºया दोघांना बंदोबस्तावरील पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न के ला असता त्या समाजकंटकांनी थेट ‘खाकी’वरच हात घालत वर्दी फाडून पोलिसांना धक्काबुक्की केली होती. यावेळी एकाने तलवारही जवळ बाळगल्याचे पोलिसांना आढळून आले होते. या गुन्ह्यातील संशयित रवींद्र मोहन धोत्रे, गणेश पंढरीनाथ धोत्रे (रा. पेठरोड) या दोघांना अटक करण्यात आली आहे.याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवारी विसर्जन मिरवणुकीदरम्यान भद्रकाली भाजीबाजाराजवळ संशयित रवींद्र व गणेश यांनी भांडण करत मिरवणुकीमध्ये उपद्रव माजविण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस नाईक राजेश सोळसे यांनी त्यांना समज देऊन रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सोळसे यांना धक्काबुक्की करून त्यांचा गणवेश फाडला होता. यावेळी रवींद्रने जवळ तलवारही बाळगली होती. या दोघांवर भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक जोनवाल करीत होते. त्यांनी दोघा संशयितांना बुधवारी दुपारी अटक केली.