दिंडोरी : तालुक्यातील पिंपळगाव धूम येथे शेतरस्त्याच्या वादातून झालेल्या भांडणात पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी दोन दुचाकीवरून निघालेल्या चौघांचा पाठलाग करत उमराळे खुर्द शिवारात पिकअप अंगावर घातल्याने दोघांचा मृत्यू झाला असून, तीन जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. या प्रकरणी दिंडोरी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी घडली. बाळकृष्ण खंडेराव काशीद, संपत नाना गांगुर्डे अशी मृतांची नावे आहेत.पिंपळगाव धूम येथे शेतातील रस्त्याच्या वादातून वसंत नामदेव बेझेकर यांचा भास्कर तुकाराम घिवंदे, उत्तम तुकाराम घिवंदे, बाकेराव तुकाराम घिवंदे, तुकाराम मुरलीधर घिवंदे, मनीषा बाकेराव घिवंदे, रामनाथ सुका कोराळे यांच्यात वाद झाला. याबाबत वसंत बेझेकर यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, उपरोक्त सहाजणांनी मारहाण करत तुम्ही पोलीस ठाण्यात कशी फिर्याद देता हेच बघतो. फिर्याद द्यायला गेलात तर रस्त्यातच गेम करू, असा दम दिला. यानंतर वसंत बेझेकर हे साक्षीदार विष्णू खंडेराव काशीद, वामन नामदेव बेझेकर, बाळकृष्ण खंडेराव काशीद, संपत नाना गांगुर्डे यांना घेऊन दिंडोरी पोलिसांत तक्रार द्यायला दोन दुचाकींवर निघाले. यावेळी उत्तम तुकाराम घिवंदे यांनी त्यांचा पिकअपने (क्र. एमएच १५ बीजे ९३१) पाटलाग करत निगडोळजवळ उमराळे खुर्द फाटा, खडकी येथे वामन बेझेकर यांच्या दुचाकीस पाठीमागून धडक दिली. त्याचबरोबर दुसऱ्या दुचाकीलाही धडक दिली. यात बाळकृष्ण खंडेराव काशीद, संपत नाना गांगुर्डे हे दोघे जागीच ठार झाले, तर वसंत बेझेकर, वामन बेझेकर जखमी झाले आहे. याबाबत वसंत बेझेकर यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी दिंडोरी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली आहे.
दोघांचा हकनाक बळी
दिंडोरी तालुक्यात सध्या जमिनीच्या वादातून तक्रारी मोठय़ा प्रमाणात वाढत असून, गेल्या महिन्यात ओझे येथे भावाचा भावाकडून खून झाला होता, तर शुक्रवारी पिंपळगाव धूम येथे झालेल्या शेतरस्त्याच्या वादात साक्षीदार बाळकृष्ण खंडेराव काशीद, संपत नाना गांगुर्डे कथित अपघात घातपाताचे बळी पडल्याने हळहळ व्यक्त होत आहे