नाशिक : जिल्ह्यात आतापर्यंत प्रामुख्याने कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसीच दिल्या जात आहेत. दोन्ही लसींपैकी कोणत्याही लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही एकाही व्यक्तीचे जिल्ह्यात निधन झालेले नाही. त्यातून या दोन्ही लसी परिणामकारक असल्याचे दिसून येत असून, सामान्य नागरिकांच्या दृष्टीने ती अत्यंत दिलासादायक बाब आहे.
भारतीय वातावरणात जेव्हा एखाद्या मनुष्याला लस दिली जाते तेव्हा त्यानंतर १३ - १४ दिवसांनी त्याच्या शरीरात बी पेशी म्हणजे अँटीबॉडीज विकसित होण्यास सुरुवात होते. पण त्या अद्याप सुरक्षा पातळीपर्यंत पोहोचलेल्या नसतात. त्यानंतर कमीत कमी दोन ते तीन आठवडे अँटीबॉडीज निर्माण होत राहतात आणि मग सुरक्षा पातळीपर्यंत पोहोचतात. दुसरा डोस किंवा बुस्टर दिला जातो, जो रोगप्रतिकारशक्तिला अधिक प्रोत्साहन देतो, आता फक्त बी पेशींच नव्हे, तर टी पेशीदेखील निर्माण होऊ लागतात, ज्या दीर्घकालीन रोगप्रतिकारशक्तीसाठी खूप आवश्यक आहेत. लस घेतल्यानंतर व्यक्तीच्या शरीरात अँटीबॉडीज कित्येक महिने, अगदी वर्षभरदेखील निर्माण होत राहतात. त्यामुळे लस घेतलेली असली तरी संसर्ग शृंखला तोडण्यासाठी मास्क सतत वापरणे, योग्य प्रकारे सॅनिटायझेशन करणे या उपाययोजना करत राहणे गरजेचे आहे.
इन्फो
साईड इफेक्टची भीती बऱ्यापैकी दूर
शरीरामध्ये अँटीबॉडीज निर्माण करून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम लस करते. बाहेरील एखादे प्रोटीन किंवा विषाणू किंवा बॅक्टेरिया यांच्या स्वरूपात अँटिजन शरीरात आल्यावर शरीर आपल्या अँटीबॉडीजच्या साठ्याच्या मदतीने प्रतिकारक्षमता उभारते, आता या अँटीबॉडीज संसर्गाविरोधात लढण्यासाठी सज्ज झालेल्या असतात. रोगप्रतिकारशक्ती काही दिवस, आठवडे किंवा काही महिन्यांच्या कालावधीत विकसित केली जाते. अद्याप सर्वसामान्यांच्या मनामध्ये लसीच्या दुष्परिणामांचा म्हणजेच साईड इफेक्टचा संभ्रम होता. लसीच्या साईड इफेक्टची भीती अनेकांच्या मनात होती. भारत सरकारने कोरोना लसीकरण मोहिमेसाठी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या ‘कोविशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिल्यानंतरही ती भीती प्रदीर्घ काळ होती. ती आता बऱ्यापैकी दूर झाली आहे. दोन्ही लसींचे सौम्य परिणाम होतात. त्यामध्ये लसीचे इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी दुखणं, सूज येणं, लाल रंगाचा डाग पडणं, दंड ठणकणे, इंजेक्शन लावण्यात आलेला हात अशक्त होणं, अंगदुखी, डोकेदुखी, ताप, अस्वस्थ वाटणं, अशक्तपणा, उलट्या होणं अशी लक्षणं दिसून येतात.
इन्फो
साईड इफेक्ट दिसल्यास घ्यावा सल्ला
‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रव्हेन्शन’ने दिलेल्या माहितीनुसार जर अंगदुखी किंवा अस्वस्थ वाटत असेल तर संबंधित व्यक्तीने त्यांच्या कौटुंबीक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही पेन किलर घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार या गोळ्या घ्याव्यात की नाहीत, याबद्दलचा निर्णय घेऊ शकता. लस घेण्याआधीच अशा प्रकारच्या गोळ्या घेऊ नयेत. कारण यामुळे गंभीर स्वरुपाचे साईड इफेक्ट होऊ शकतात, हेदेखील लक्षात ठेवणे आवश्यक आहे.