नाशिक : पेट्रोल बाटलीत देणे हा अपराध आहे. त्यामुळे नाशिकसह राज्यात जेथे कोठे कोणी अशाप्रकारे पेट्रोलव्रिकी करत असेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, तसे आदेश पोलीस प्रशासनासह जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले. पेट्रोलद्वारे महिला गंभीररित्या भाजण्याची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले. या घटनेत चौकशीअंती जे कोणी दोषी आढळून येतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत, असे ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना निफाड तालुक्यातील लासलगावमध्ये एका बसस्थानकावर महिलेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना शनिवारी (दि.१५)संध्याकाळच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती समजताच ठाकरे रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास जिल्हा शासकिय रूग्णालयात पोहचले. गंभीररित्या भाजलेल्या महिलेची जळीत कक्षात जाऊन त्यांनी पाहणी केली. यावेळी तिच्या नातेवाईकांनी दिलेले निवेदन स्विकारून त्यांनी या निवेदनात करण्यात आलेल्या मागणीनुसार उपस्थित विशेष पोलीस महानिरिक्षक छेरींग दोरजे, पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांना या घटनेची सखोल चौकशी करून दोषी हल्लेखोरांविरूध्द कठोर कारवाईचे आदेश दिले. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, विशेष कार्यधिकारी मिलिंद नार्वेकर अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय गांगुर्डे आदि उपस्थित होते.