सटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून फेब्रुवारी महिन्यातच दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या बागलाण तालुक्यातील रामतीर गावाने विशेष ग्रामसभा आयोजित करून जोपर्यंत गावाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविला जात नाही तोपर्यंत आगामी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसह विधानसभा व लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रामतीर गाव दुष्काळाचा सामना करत असून जेथे माणसांना प्यायला पाणी नाही तेथे जनावरे व शेतीची अवस्था काय असेल असा सवाल उपस्थित करत विशेष ग्रामसभेत जोपर्यंत गावासाठी कायमस्वरूपी पाण्याची शाश्वत व्यवस्था केली जाणार नाही तोपर्यंत कोणत्याही निवडणुकीत मतदान करायचे नाही असा निर्णय ग्रामसभेत (ठराव क्र मांक ३) घेण्यात आला आहे.निवडणुका आल्या की पाणी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन द्यायचे आणि निवडणूक संपली की पाच वर्षे गावाकडे ढुंकुनही पाहायचे नाही असे राजकारण सुरु असल्याचा आरोप करत आता राजकारण्यांना वठणीवर आणण्यासाठी कोणत्याही निवडणुकीत सहभाग न घेण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे. हरणबारी उजवा कालवा हे केवळ स्वप्न दाखविले जात असून या कालव्याचा प्रश्न सुटला असता तर रामतीरचा पाणीप्रश्न कधीच सुटला असता यावर देखील ग्रामसभेत चर्चा करण्यात आली.आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यासाठी बाळासाहेब बळीराम आहिरे यांनी सूचना मांडली, या सूचनेला केवळ निंबा अहिरे यांनी सर्वानुमते अनुमोदन दिले.
पाण्यासाठी निवडणुकांवर बहिष्कार ; रामतीर ग्रामस्थांचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:32 PM