नाशिक : जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धनामध्ये सिंहाचा वाटा असलेल्या ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याला मौजे मेटघर, तळवाडे गावांच्या शिवारात अवैधरित्या उत्खनन सर्रासपणे भुमाफियांकडून केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा प्रशासनासह वनविभागही खडबडून जागे झाले आहे. नाशिक पश्चिम वनविभागाने उत्खननाची जागा वनजमिन आहे किंवा नाही, हे शोधून काढण्यासाठी आता सातबारा उताऱ्यांची छाननी सुरु केली आहे.
त्र्यंबकेश्वरजवळील ऐतिहासिक-पौराणिक धार्मिक महत्व प्राप्त असलेल्या ब्रम्हगिरी पर्वत गोदावरीचे उगमस्थान आहे. या पर्वताभोवती जैवविविधता समृध्द असली तरी वारंवार या नैसर्गिक समृध्दतेला नख लावण्याचा प्रयत्न काही भुमाफियांकडून होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. आठवडाभरापुर्वी असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
थेट ब्रम्हगिरीच्या पायथ्याशी जेसीबी, पोकलॅनसारखी अजस्त्र यंत्रे जणू या पर्वताच्या पायथ्याला नाचविली जात आहे की काय? असे चित्र पहावयास मिळत होते. याबाबत पर्यावणप्रेमींनी आवाज उठविल्यानंतर ब्रम्हगिरी वाचवा या चळवळीने सोशलमिडियावर जोर धरला. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाचे कान टोचले. यानंतर तत्काळ जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले. मंडलधिकारी यांनी खासगी जमीन मालकाला नोटीसही बजावण्यात आली.
दरम्यान, उत्खननात ब्रम्हगिरीच्या आजुबाजुला असलेल्या वृक्षसंपदेलाही हानी पोहचली. वनजमीनीत खोदकाम करत नसून खासगी जागेत करत असल्याचा दावा संबंधितांकडून करण्यात आला होता. मात्र वनखात्याची हद्द कोठून सुरु होते आणि नेमकी कोठे संपते याविषयी संभ्रमवस्था असल्याने उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांनी ब्रम्हगिरीचा पायथा गाठला. यावेळी सहायक वनसंरक्षक गणेश झोळे यांना याबाबत आदेश देत जुन्या नोंदीवरुन माहिती घेत प्रत्यक्षपणे सर्वेक्षण केले जाणार आहे.