नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील डोंगराच्या पायथ्याशी अवैधरीत्या उत्खनन करण्यात येत असल्याची बाब समोर आल्यानंतर याप्रकरणी संबंधित ठेकेदाराला दीड कोटींचा दंड ठोठविण्यात आला आहे. याप्रकरणी तलाठी, कोतवालांवरही कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे.
सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील ब्रह्मगिरी पर्वताच्या जवळ सुरू असलेल्या अवैध खोदकामाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असतानाच तीन दिवसांपूर्वी या ठिकाणी जेसीबीच्या साह्याने अवैधरीत्या उत्खनन सुरू असल्याचा प्रकार समेार आला होता. स्थानिक नागरिक तसेच पर्यावरणप्रेमी नागरिकांनी याप्रकरणी आवाज उठवित जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले होते. प्रांताधिकाऱ्यांनी याप्रकरणी चौकशी केली असता या क्षेत्रात जेसीबीच्या साह्याने दोन हजार ब्रास गौण खनिजाचे उत्खनन झाल्याचे आढळून आल्याने संबंधित ठेकेदारावर दीड कोटींची दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर घटनास्थळावरून जेसीबीदेखील ताब्यात घेण्यात आला.
पर्यावरण तसेच जैवविविधतेच्या दृष्टीने ब्रह्मगिरी पर्वत महत्त्वाचा मानला जातो. या पर्वतरांगांमध्ये वन्यजीवांचा अधिवास असून, गिधाडांचे राखीव वनक्षेत्रदेखील आहे. त्यामुळे संरक्षित असलेल्या या क्षेत्रात कोणतेही उत्खनन तसेच वृक्षतोड करता येत नसल्याने डोंगरावर सुरू असलेल्या खोदकामाला पर्यावरणप्रेमी तसेच स्थानिक नागरिकांनीदेखील विरोध केला होता. सदर प्रकरण थेट पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचल्याने त्यांनी या प्रकरणी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली, तर येथील कोतवाल तसेच तलाठी परदेशी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.
---इन्फो---
गेेल्या काही महिन्यांपासून ब्रह्मगिरीच्या पायथ्याला सुरुंग स्फोट घडवून आणले जात असल्याची तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. या ठिकाणी जमिनीचे सपाटीकरण तसेच सुरुंगाद्वारे दगड बाजूला करण्याचे काम सुरू होते. यामुळे ब्रह्मगिरी पर्वताला धोका निर्माण झाल्याची तक्रार काही पर्यावरणप्रेमींनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली होती. मंत्र्यांनीच या प्रकरणी लक्ष घातल्याने प्रशासनाकडून तातडीने कारवाई करण्यात आली.