नाशिक : अशोकस्तंभ येथे राज्य परिवहन महामंडळाच्या ग्रामीण मिनी बसने दुचाकीस्वार व मोटारीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या तिहेरी अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, इगतपुरी-नाशिक या मार्गावरील मिनी बस ‘यशवंती’ (एम.एच.०७ सी ७६९५) अशोकस्तंभावरून पंचवटी आगाराकडे जात असताना सदर अपघात झाला. बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे बसने पाठीमागून दुचाकीला (एमएच १५ बीएम २७११) जोरदार धडक दिली त्यानंतर मारुती स्विफ्ट मोटार (एमएच १५ एफएफ १२६४)ला धडक दिली. अशा या तिहेरी अपघातात दुचाकीस्वार सुनील खंडू पठाडे (४०, रा. गंगापूर) हा जखमी झाला असून, त्याला उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे कारण प्रथमदर्शनी समोर आले आहे. अपघाताची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिसांसह वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहचले. अपघातामुळे वाहतूक विस्कळीत झाल्याने अशोक स्तंभावरून घारपुरे घाटमार्गे पंचवटीकडे जाणारी वाहतूक वळविण्यात आली होती. अपघातग्रस्त वाहनांजवळ बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. अपघातानंतर बसचालक संदीप हरिश्चंद्र धनवटे (२९,रा.देवळाली) यांनी पोलीस ठाण्यात हजर होऊन अपघाताची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
बसचे ब्रेक निकामी; तिहेरी अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 12:55 AM