नायगाव - सिन्नर तालुक्यातील ब्राम्हणवाडे येथील पाणीपट्टी थकबाकीदारांचा पाणीपुरवठा महिनाभरानंतर खंडीत होणार असल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने दिली आहे.
ग्रामस्थांना वारंवार आवाहन करुनही थकबाकीचा भरणा केला जात नसल्याने ग्रामपालिकेने अखेर हा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतीकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व वीज वितरण कंपनीची थकबाकी मोठया प्रमाणात वाढली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामस्थांना व परिसरातील कंपन्यांना अनेकवेळा नोटीस देऊन घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यास सांगितले आहे. असे असतांनाही ग्रामस्थ घरपट्टीसह पाणीपट्टीही भरत नाहीत. अनेक ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षापासुन पाणीपट्टी थकवली आहे. तर काही लोक राजकीय द्वेषापोटी जाणूनबुजून सर्वसामान्य ग्रामस्थांना कर भरण्यास मनाई करत असल्यामुळे ग्रामपंचायतीची थकबाकी दिवसेंदिवस वाढत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान ग्रामपंचायत प्रशासनाने थकबाकीदार ग्रामस्थांनी महिनाभरात थकबाकी भरली नाही तर संबधीतांचा पाणीपुरवठा खंडीत करण्याचा निर्णय सदस्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मोठया प्रमाणात घरपट्टी व पाणीपट्टी थकल्याने ग्रामपंचायत प्रशासनाला गावात लोकहितांची कामे करता येत नसल्याची खंत व्यक्त होत आहे.मूलभूत सुविधा पुरविण्यास अडचणींगेल्या अनेक दिवसांपासुन अनेक ग्रामस्थ पाणीपट्टी व घरपट्टी भरत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला गावातील मूलभूत सुविधा पुरविण्यास आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. थकबाकीदार ग्रामस्थांनी पाणीपट्टी व घरपट्टी भरून सहकार्य करावे.-- मंगला घुगे, सरपंच,ब्राम्हणवाडे