वीरगाव : येथील महामार्गालगत असलेल्या सप्तशृंगी कृषी सेवा केंद्र या दुकानाचा मागील दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली. ही घटना गुरुवारी रात्री घडली. ३३ हजारांच्या रोख रकमेसह आवश्यक कागदपत्र या चोरट्यांनी लंपास केले. या प्रकारामुळे परिसरातील व्यावसायिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. वीरगाव गावात चोरीच्या घटना नेहमीच्या झाल्या आहेत. यामागे चोरट्यांची स्थानिक टोळी कार्यरत असल्याचा अंदाज नागरिकांमधून वर्तविला जात आहे.विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावरील वीरगाव येथे सुमारे २८ ते ३० व्यवसायिकांनी आपले व्यवसाय थाटले आहेत. यात सर्वच प्रकारच्या व्यवसायिकांचा समावेश आहे. गुरुवारी रात्री येथील सप्तशृंगी कृषी सेवा केंद्र या दुकानाचा मागील दरवाजा तोडून चोरांनी दुकानात प्रवेश केला.यावेळी दुकानातील वस्तू अस्ताव्यस्त करण्यात येऊन कपाटात ेठेवलेले ३३ हजार रुपयांची रोकड व कागदपत्र चोरून नेण्यात चोरटे यशस्वी झाले. शुक्रवारी सकाळी दुकानमालक उत्तम रौंदळ यांनी दुकान उघडले. चोरी झाल्याचे उघड झाले. वीरगाव गावात तसेच परिसरात चोरीचे सत्र सुरू असून, पोलिसांना आजपर्यंत एकही चोरीचा छडा लावण्यात यश आले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (वार्ताहर)
वीरगावी धाडसी चोरी; रोख रकमेसह कागदपत्र लंपास
By admin | Published: April 21, 2017 11:57 PM