नाशिक : शहरातील खवय्यांसाठी अस्सल गावरान ठसक्यासाठी डोेंगरे वसतिगृहावरील विभागीय महिला बचतगटाच्या गोदाई प्रदर्शनाचे आकर्षण ठरत आहे. विभागीय आयुक्त कार्यालय तसेच महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोती अभियानाच्या संयुक्त वतीने नाशिकला ४ ते १० मार्च दरम्यान विभागीय महिला बचतगटाचे ‘गोदाई’ प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात महिला बचतगटांनी तयार केलेल्या अनेक वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यातच गावरान बाज असलेल्या खाद्यपदार्थांना तर शहरातील खवय्यांनी मनमुराद दाद दिली आहे. या प्रदर्शनात अस्सल गावरान पद्धतीचे खापरावरील मांडे, भाजणीची दशमी, थालीपीठ, वडे, कळण्याची भाकरी व भरीत, पेठ- सुरगाणा भागातील गावरान कोंबडीची चवदेखील चाखण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या प्रदर्शनामुळे ग्रामीण भागातील महिलांना त्यांनी उत्पादित केलेली उत्पादने ग्राहकांपर्यंत थेट पोहोचवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. शांता टिळे यांच्या भाजणीच्या थालीपिठाला प्रदर्शनात दाद मिळत आहे. खापरावरील मांड्याची चव चाखण्यासाठी कळवणच्या धनदायी माता महिला बचतगटाजवळ खवय्ये गर्दी करीत आहेत. (प्रतिनिधी)
कळण्याची भाकरी अन् खापरावरचे मांडे
By admin | Published: March 08, 2017 12:40 AM