नाशिक : शहराला जोडलेल्या २० खेड्यांच्या विकासासाठी महापौर रंजना भानसी यांनी सन २०१७-१८ च्या अंदाजपत्रकात १० कोटी रुपयांची तरतूद केली असली तरी आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी निधी उपलब्धतेनंतरच त्याबाबत कार्यवाही केली जाणार असल्याचे स्पष्ट केल्याने खेडे विकास निधीला तूर्त ब्रेक बसला आहे.स्थायी समितीने महापालिकेचे अंदाजपत्रक महासभेला सादर केल्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी प्रत्येक नगरसेवकाला प्रभागाच्या विकासासाठी ७५ लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती शिवाय, शहराला जोडल्या गेलेल्या २० खेड्यांच्या विकासासाठीही १० कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यानुसार, प्रत्येक खेड्याला ५० लाख रुपयांचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, आयुक्तांनी नगरसेवक निधीच्या घोषणेबाबत सुरुवातीला केवळ ४० लाखांच्याच निधीला मान्यता दर्शविली. मात्र, महापौरांसह पदाधिकाºयांनी आयुक्तांची भेट घेऊन ७५ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली असता आयुक्तांनी वाढत्या स्पील ओव्हरकडे निर्देश केले होते. त्यामुळे, महापौरांनी मागील पंचवार्षिक काळातील प्रशासकीय मान्यता न मिळालेल्या आणि निविदा प्रक्रियेत नसलेल्या सुमारे २०२ कोटी रुपयांची कामे वगळण्यास संमती दर्शविली व स्पील ओव्हर कमी केला. त्यानंतरच, आयुक्तांनी ७५ लाख रुपयांचा नगरसेवक निधी देण्यास हिरवा कंदील दाखविला. आता खेडे विकास निधी उपलब्ध करून देण्यासाठी महापौरांसह पदाधिकाºयांनी आयुक्तांशी चर्चा केली परंतु, आयुक्तांनी निधी उपलब्धतेनंतरच खेड्यांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे खेडे विकास निधीला तूर्त ब्रेक बसला आहे. महापालिकेला अपंगांच्या पुनर्वसनासाठी सुमारे १४ कोटी रुपये तातडीने उपलब्ध करून द्यावे लागले आहेत. त्यामुळे खेडे विकासासाठी निधी आणायचा कुठून या पेचात प्रशासन सापडले आहे.
खेडे विकास निधीला तूर्त ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 12:59 AM