नाशिक : सातवा वेतन आयोग लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी एस.टी. चालक-वाहकांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाचा मोठा प्रभाव महामंडळाच्या नाशिक विभागावर पडला. मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेला चालक-वाहकांचा संप आज दुसर्या दिवशीही सुरूच असून अधिक तीव्र झाला आहे. यामुळे ‘एस.टी’ ला ब्रेक कायम आहे. संपासोबत नागरिकांचेही हाल सुरू आहे. प्रादेशिक परिवहन विभाग व महामंडळाने खासगी वाहतूकदारांची मदत घेत त्यांना परमिटची अट शिथिल करुन प्रवाशी वाहतूक करण्याची परवानगी राज्यात कोणत्याही शहरासाठी दिली आहे. यामुळे नाशिकमध्ये प्रवाशांचे हाल कमी होताना दिसत असून सर्वच बसस्थानकांमध्ये शुकशुकाट पसरला आहे.
खासगी वाहतूकदारदेखील एसटीच्या दरामध्ये प्रवाशी वाहतूक करण्यासाठी पुढे आले आहे. यामुळे नागरिकांना नाशिक येथून अन्य शहरांमध्ये जाण्यासाठी पर्यायी वाहतूकीचे साधन सवलतीच्या दरात उपलब्ध झाले आहे. एकूणच खासगी वाहतूकीचा पर्याय जरी नागरिकांपुढे असला तरी गैरसोय काही प्रमाणात होतच आहे. शहरांंतर्गत होणासर्वच बसस्थानकांमध्ये शुकशुकाट वाहतूकीवरही संपाचा प्रभाव दिसून येत आहे. लांब पल्ल्याची बससेवा प्रभावीत झाली असली तरी खासगी वाहतूकदारांचा पर्याय प्रवाशांपुढे आहे; मात्र शहरांतर्गत वाहतुकीची सर्व जबाबदारी रिक्षा चालकांवर येऊन ठेपली आहे. ऐन सणासुदीच्या काळात शहर बससेवाही दुसर्या दिवशी ठप्प राहिल्याने संताप व्यक्त होत आहे. महामंडळाच्या गलथान कारभाराविषयी नाशिककरांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. महामंडळाच्या अधिकार्याना शहर बस वाहतूकीचा संपही अद्याप मिटविता आला नसल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ज्येष्ठ नागरिकांचे मोठे हाल होत आहे.