मानोरी : दिवाळीनंतर कांद्याचे दर हमखास वाढणार या अपेक्षेने साठवून ठेवलेल्या उन्हाळ कांद्याचे दर मात्र सातत्याने घसरत आहेत. याबरोबरच अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही लॉकडाऊन होतो की काय, या धास्तीने बाजार समित्यांत गेल्या दोन- तीन दिवसांपासून अचानक कांदा आवकेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे.
गत महिनाभरापूर्वी उन्हाळ कांद्याच्या दराने आठ हजार रुपये प्रतिक्विंटलचा टप्पा ओलांडल्याने शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. सुमारे आठ महिन्यांपासून चाळीत साठवून ठेवल्याने कांद्याच्या वजनातदेखील कमालीची घट झाली असल्याचे शेतकर्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यात कांद्याचे वाढलेले दर लक्षात घेताच केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात बंद करणे, तुर्कस्तान, इजिप्त आदीसारख्या देशातून कांदा आयात करून कांदा दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न केले. त्यात व्यापारी वर्गाच्या कांदा साठवणुकीवरदेखील निर्बंध घातल्याने कांद्याच्या दरात घसरण होत गेली.
दिवाळी सणानंतर दरवाढीच्या अपेक्षा शेतकरी वर्गाला लागून होत्या. दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणात लाल कांदादेखील जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांत विक्रीसाठी येऊ लागलेला आहे. त्यात वातावरणात अचानक बदल होऊन अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात धास्तावलेला आहे. या दुहेरी संकटामुळे शेतकर्यांनी दरवाढीच्या अपेक्षेकडे पाठ फिरवून, आहे त्या दरात कांदा विक्रीसाठी बाजार समित्यांत नेऊ लागल्याने अचानक कांदा आवकेत वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे.
-----
ढगाळ हवामानामुळे शेतकरी मेटाकुटीला...
अवकाळी पाऊस पडल्यानंतर गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सर्वत्र ढगाळ हवामान निर्माण झाले आहे. पहाटेच्या वेळी धुके आणि दव पडत असल्याने रब्बी हंगामातील पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कांद्यावर माव्याचा प्रभाव दिसून येत असून, शेंडे पिवळसर पडत असल्याने सातत्याने औषध फवारणी करण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे. त्यात कांद्याच्या दरात घसरण होत नसल्याने शेतकरी संभ्रमात सापडले आहेत.
--------------
लासलगावमध्ये कांद्याचे दर
उन्हाळ कांदा - किमान १५६१ , कमाल ४२३० , सर्वसाधारण ३३०० रुपये
लाल कांदा - किमान २००१ , कमाल ४९००, सर्वसाधारण ४३०० रुपये
----