पाळे खुर्द : दुष्काळाची धग दिवसेंदिवस वाढत चालली असतानाच आता पाण्याच्या चोरीच्याही घटना घडू लागल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील धनोली येथील धरणाचे गेट तोडल्याची घटना घडली असून त्यामुळे धरणातील सुमारे सात ते आठ दसलक्षघनफूट इतके पाणी वाया गेले आहे. धरणाचे गेट तोडणाऱ्या दळवट येथील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्र वारी (दि.१७) सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान धनोली धरणाचे लोखंडी गेट तोडण्यात आल्यानंतर धरणातून अचानक पाण्याचा प्रचंड असा लोंढा सुटल्याने धरणाच्या बाजूस शेतात काम करीत असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली. शेतक-यांनी लगोलग गेटकडे धाव घेतली असता तेथे चार इसम संशयास्पद स्थितीत आढळले. शेतक-यांनी संबंधित इसमांना पकडले आणि धनोली गावातील मंदिरात त्यांना कोंडून ठेवले. या इसमांनी चौकशी केली असता ते चौघेही दळवट येथील रहिवाशी निघाले. हि बातमी पसरताच धनोली गावात रात्रभर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याची कुणकुण प्रशासकीय यंत्रणेला लागताच संपूर्ण यंत्रणा धनोली गावात रात्री नऊ वाजेच्या सुमारास हजर झाली. कळवणचे तहसीलदार बंडू कापसे तसेच पोलीस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे यांचेसह अभोणा पोलीस उपनिरीक्षक गायकवाड व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अभिजित रौंदळ हे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सदर तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान,ल धरणाचे गेट तोडणारे दळवट येथील प्रमोद बयाजी पवार (६०), सोनू बंडू गावित(६०), शंकर केवजी चव्हाण (५५) आणि सुभाष येवाजी पवार (६०) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान म्हणून कलम ३ व ७ अन्वये नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी(दि.१९) सदर आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
धनोली धरणाचे गेट तोडून पाणीचोरीचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 6:16 PM
दळवटच्या चौघांना अटक, गुन्हा दाखल
ठळक मुद्देधनोली गावात रात्रभर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते