नाशिक : अधिकृत मान्यतेशिवाय वृक्षगणना करणाऱ्या ठेकेदाराला वाढीव कामासाठी १ कोटी ९० लाख रुपये अदा करण्यासाठी काही नगरसेवकांनी आटापिटा केला असला तरी वृक्षप्राधीकरण समितीच्या सदस्यांनी दिलेले विरोधाचे पत्र आणि आयुक्त कैलास जाधव यांच्या भूमिकेमुळे हा प्रयत्न हाणून पडला आहे. महापालिकेच्या वतीने शहरातील वृक्षगणनेसाठी मे. टेरॉकॉन इकोटेक प्रा. लिमिटेड कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. वृक्षांची संख्या अधिक वाढल्याने या संस्थेने जादा कामांसाठी त्याबद्दल १ कोटी ९० लाख रुपये मिळविण्यासाठी दावा केला. विशेष म्हणजे ज्यादा वृक्षगणनेसाठी अधिक आर्थिक तरतूद लागणार असताना त्याबाबत मात्र कोणत्याही प्रकारे महासभा, वृक्षप्राधीकरण समितीसारख्या प्राधीकरणाकडून प्रशासकीय मान्यता घेण्यात आलेली नाही. त्यामुळे हा विषय वादात सापडला आहे. महासभेत हा प्रस्ताव दोन वेळा फेटाळण्यात आल्यानंतर आता हा प्रस्ताव आता वृक्षप्राधीकरण समितीत हा प्रस्ताव मांडून तो मंजूर करण्याची तयारी सुरू होती. त्यानुसार मंगळवारी (दि.१०) वृक्षप्राधीकरण समितीसमेार हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. बैठकीत अजिंक्य साने, वर्षा भालेराव, चंद्रकांत खाडे यांनी विरोधाचे पत्र दिले त्याचबरोबर आयुक्त कैलास जाधव यांनी या अनियमितते विषयी ज्यांच्या काळात हा प्रकार घडला त्यांची चौकशी करण्याचे सुतोवाच केले आहे.
-