पिळकोस : कळवण तालुक्यातील भादवणसह परिसरात दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने भादवण गाव ते विसापूरला जोडणाऱ्या रस्त्याला भगदाड पडले असून, भादवण येथील आदिवासी वस्तीत घराची भिंत कोसळली आहे.भादवण-विसापूर हा चार किलोमीटरचा अरुंद रस्ता असून या रस्त्याला लागून खोल दरी आहे. या रस्त्यावरून शिवारातील पावसाचे पाणी वाहिल्या कारणाने या रस्त्याला चार ठिकाणी मोठ मोठे भगदाड पडले असून ही भगदाड खोल झालेली आहेत व रस्त्याच्या काठापर्यंत आलेली असल्यामुळे रस्ता वळणाच्या ठिकाणीही भगदाड पडल्यामुळे मोठ्या वाहनांना वळण घेताना मागील चाक या भगदाडात गेल्यास वाहन खोल दरीत जाऊन, मोठा अपघात होण्याची शक्यता येथील शेतकरीबांधवांकडून व्यक्त होत आहे.रस्त्याला पडलेल्या भगदाडामुळे या रस्त्यानी जाणारी एस.टी. बस बंद झालेली असून, शिवारातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर ट्रॉली शेतात नेता येत नसून रस्त्यावरील वळणामुळेही मोठी वाहने वळण घेताना अपघात होण्याची भीती आहे. भगदाड बुजवून रस्ता वाहतुकीस सुरळीत करावा, अशी मागणी मोहन जाधव, प्रवीण जाधव, काकाजी जाधव, गौतम जाधव व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.भादवण गावातील बायजाबाई पवार यांची भिंत कोसळून नुकसान झालेले आहे. ही भिंत रात्री अचानक कोसळली, मोठा अनर्थ टळला असून तलाठी ए. डी. पवार व कोतवाल पंकज बच्छाव यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे . (वार्ताहर)
विसापूर रस्त्याला भगदाड
By admin | Published: August 05, 2016 12:40 AM