येथील जय श्रीराम मंडळ संचलित दत्त मंदिराच्या वतीने दत्त जयंती निमित्ताने दरवर्षी येथे मोठा दत्त जन्म सोहळा साजरा केला जातो. यानिमित्ताने पारायण, अखंड हरिनाम सप्ताहात प्रवचन, कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रमांची सप्ताहभर रेलचेल असते. गेल्या २५ वर्षांपासून नियमितपणे जय श्रीराम मंडळाचे कार्यकर्ते आयोजन करतात. परिसरातील भाविकांचा यास चांगला प्रतिसाद असतो; मात्र यंदा कोरोना संसर्गामुळे शासनाने अशा कार्यक्रमास पूर्णपणे मज्जाव केल्याने २५ वर्षांची परंपरा पहिल्यांदाच खंडित झाल्याने भाविकांचा हिरमोड झाला आहे. भाविक सामुदायिकपणे पारायण न करता आपापल्या घरी स्वतंत्रपणे पारायण करीत आहेत. विविध स्पर्धा, महाप्रसाद या सर्वांना यंदा फाटा देण्यात आला आहे; मात्र मंदिर परिसरावर विद्युत रोषणाई करुन परिसर सजविण्यात आला आहे. कोरोना संसर्गाचे नियम पाळून भाविकांना दर्शनाची सोय उपलब्ध करुन देण्यात आल्याचे मंदिराचे अध्यक्ष व मनपा स्थायी समिती सभापती राजाराम जाधव व पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
श्री दत्त पारायणाची २५ वर्षांची परंपरा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 4:12 AM