सातपूरच्या राज्य कर्मचारी सोसायटीत राहणारे रामदास सुकर भोये यांनी मंगळवारी (दि. १७) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सीबीएस येथील स्टेट बँकेच्या शाखेतून सात लाख रुपये रोख रक्कम काढली. ती घेऊन ते त्यांच्या चारचाकी (एम एच १५ जे आर ३०३९)ने मुलाच्या सिडकोतील हेगडेवार नगर येथील सासुरवाडीला आले. भोये यांनी बँकेतून काढलेली रक्कम कारच्या मागच्या सीटवर पिशवीत ठेवली होती. दरम्यान, भोये हे मुलाच्या सासुरवाडीच्या घरात गेले असता त्यांना कारची काच फुटण्याचा आवाज आला. त्यांनी बाहेर येऊन बघितले असता दुचाकीवर आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांच्या कारच्या चालकाच्या सीटच्या बाजूने मागील काच फोडल्याचे, तसेच दुचाकीवर बसलेल्या मागच्या व्यक्तीच्या हातात रोकड असलेली पिशवी दिसून आली. यावरून भोये व त्यांच्या मुलांनी त्या दुचाकीस्वाराचा पाठलाग केला असता पिशवीमधून दीड लाख रुपये खाली पडले. मात्र, त्यावेळी ते भामटे पळून जाण्यास यशस्वी ठरले. याप्रकरणी भोये यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कैलास सोनवणे, दीपक वाणी करीत आहेत.
भरदिवसा कारची काच फोडून साडेपाच लाख लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 4:21 AM