अझहर शेख, नाशिक: शहरातील द्वारका परिसरात असलेल्या संत कबीर नगर झोपडपट्टीत आज संध्याकाळी ५ च्या सुमारास गॅस सिलींडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. एका घरातून सुरू झालेली आग अवघ्या अर्ध्या तासात संपूर्ण झोपडपट्टीत पसरली. एकापाठोपाठ एक तीन ते चार सिलिंडरचा स्फोट झाल्याचा अंदाज असून अग्निशमन दलाचे ११ बंब घटनास्थळी पोहोचले. अखेर तासाभरानंतर ही आग आटोक्यात आणण्यास अग्निशमन दलाला यश आले.
संत कबीर नगर झोपडपट्टी नाशिक शहरातील मोठी झोपडपट्टी मानली जाते. हा गावठाणचा परिसर असून अत्यंत दाट लोकवस्तीचा भाग आहे. संध्याकाळी एका घरात सिलिंडर स्फोटामुळे आग लागली आणि बघता बघता अनेक घरांनी पेट घेतला. त्यातील काही सिलिंडरचाही स्फोट झाल्याचं स्थानिकांनी सांगितलं. अनेक रहिवासी घरातील सिलिंडर घेऊन बाहेर पळाले.
छायाचित्र- नीलेश तांबे
घटनेचं वृत्त कळताच, अग्निशमन दलाच्या सहाही केंद्रावरचे दहा बंब आणि अंबड एमआयडीसीचा बंबही घटनास्थळी पोहोचले. अरुंद गल्ल्यांमुळे या गाड्या झोपडपट्टीबाहेरच उभ्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचण येत आहे. चार रुग्णवाहिकाही घटनास्थळी तैनात आहेत.
सारडा सर्कल ते द्वारका हा रस्ता शहर वाहतूक शाखेनं पूर्णपणे बंद केला आहे.