सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर गुरेवाडी शिवारात कोरोनाच्या नियमांची पायमल्ली करून व परवाना नसताना पायल कला केंद्रात नृत्यांगणाची छमछम सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी रात्री धाड टाकली. यात मालकासह पाच संशतियांना अटक करण्यात आली, त्यानंतर जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली.
गुरेवाडी शिवारात पायल कला केंद्र सुरू असून, त्याठिकाणी रात्रीच्या वेळी बंद खोलीत नृत्यांगणाला लाउड स्पिकरच्या आवाजावर अश्लील नृत्य केले जात असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्यासह हवालदार सुदाम धुमाळ, किशोर सानप, गौरव सानप यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास छापा टाकला. पोलिसांनी छापा टाकल्यानंतर नृत्यांगणासह सर्वांची पळापळ झाली. अंधाराचा फायदा घेत अनेकजण पसार झाले. यावेळी विशाल धोंडीराम मुसळे (४४, रा. पडासाळी, ता. माढा, जि. सोलापूर) हा कला केंद्राचा मालक पोलिसांना मिळून आला. त्याच्याकडे कला केंद्राच्या परवान्याची विचारपूस केल्यानंतर परवाना नसल्याचे समजले.
जिल्ह्यात कोरोना या संसर्गजन्य आजाराची साथ सुरू असताना व जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री ८ ते सकाळी ७ यावेळेत जमावबंदी आदेश दिले असताना सदर कला केंद्र सुरू होते. याशिवाय तेथे असलेल्यांच्या चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल बांधलेले नव्हते. पोलिसांनी मालक मुसळे याच्यासह भानुदास विश्वनाथ घुगे (३६), समीर असीफ शेख (३०, रा. पास्ते), मंगेश सुदाम भाबड (रा. नांदूरशिंगोटे), स्वप्नील कालीदास पाटील (२४, रा. नाशिकवेस, सिन्नर) या पाच संशयितांना अटक केली. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.