पंचवटी : होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी नाशिक शहरात धूलिवंदनाला सायंकाळी वीरांची सवाद्य मिरवणूक काढण्याची परंपरा यंदा खंडित झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनाने सोमवारी सकाळी ते रात्रीपर्यंत गंगाघाट परिसरात संचारबंदी लागू केल्याने यंदा धूलिवंदनाच्या दिवशी वीरांची मिरवणूक दिसली नाही, तर परंपरा म्हणून केवळ गल्लीबोळात सजलेले वीर होळीभोवती फेरा मारून घराकडे जातानाचे चित्र दिसून आले. यंदा वीरांची मिरवणूक नसल्याने गंगाघाट परिसरात सर्वत्र शुकशुकाट पसरलेला असल्याचे दिसून आले. गंगाघाट आणि रामकुंड, गाडगे महाराज पटांगण भागात जागोजागी पोलीस बळ तैनात करण्यात आले होते. दरवर्षी धूलिवंदनाच्या दिवशी गंगाघाटावर शेकडो वीरांची गर्दी होते, तर भाविक शेकडोंच्या संख्येने उपस्थित असतात. मात्र, यंदा कोरोनामुळे वीरांच्या मिरवणुकीवर निर्बंध असल्याने प्रथमच गंगाघाटावर वीरांची मिरवणूक आली नसल्याचे बोलले जात आहे. रामकुंड परिसरात पंचवटी पोलिसांनी संपूर्ण परिसरात लोखंडी बॅरिकेड्स केले होते व पोलीस बळ तैनात करण्यात आले होते. मालवीय चौकातून नागरिक खाली रामकुंडाकडे जात होते. मात्र, बॅरिकेड्समुळे नागरिकांना पुढे जाता येत नव्हते. कोणी चुकून रामकुंडावर जाण्याचा प्रयत्न केला, तर बंदोबस्तासाठी नेमलेल्या पंचवटी पोलिसांकडून अत्यंत कडक शब्दात कानउघाडणी केली जात असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
वीरांच्या मिरवणुकीची परंपरा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 12:56 AM
होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी नाशिक शहरात धूलिवंदनाला सायंकाळी वीरांची सवाद्य मिरवणूक काढण्याची परंपरा यंदा खंडित झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनाने सोमवारी सकाळी ते रात्रीपर्यंत गंगाघाट परिसरात संचारबंदी लागू केल्याने यंदा धूलिवंदनाच्या दिवशी वीरांची मिरवणूक दिसली नाही, तर परंपरा म्हणून केवळ गल्लीबोळात सजलेले वीर होळीभोवती फेरा मारून घराकडे जातानाचे चित्र दिसून आले.
ठळक मुद्देगंगाघाटावर शुकशुकाट : चौफेर पोलीस तैनात