नाशिक : कोरोनाबाधितांना जीवनदान देण्यासाठी शहरातील वैद्यकीय व्यावसायिक जोखीम पत्करून कामे करत असताना त्यांच्यावर चोवीस तासांत तीन ठिकाणी हल्ले झाल्याचे प्रकार घडले आहेत. मुंबई नाका येथील मानवता रुग्णालयात मध्यरात्री आठ ते दहा अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली. त्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली तसेच आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला. मात्र यंत्रणेने दोषींविरुद्ध कारवाई करण्याचे अश्वासन दिल्यानंतर सामाजिक बांधिलकी आणि मानवजातीवर आलेल्या संकटामुळे वैद्यकीय व्यावसायिक सेवा कायम करणार असल्याची ग्वाही आयएमएने दिली.
शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून उपचार करताना वैद्यकीय व्यावसायिकांचाही कस लागत आहे. दरम्यान, अशा स्थितीत शहरातील सातपूर, इंदिरानगर आणि मुंबई नाका येथे तीन ठिकाणी डॉक्टरांना मारहाणीचे प्रकार घडले. मध्यरात्रीच्या सुमारास मानवता रुग्णालयात अज्ञातांनी मोडतोड केल्याने वैद्यकीय क्षेत्रात संताप व्यक्त करण्यात आला. यासंदर्भात रुग्णालयाच्या फिर्यादीवरून आठ ते दहा अज्ञात व्यक्तींविरुद्ध वैद्यकीय सेवा नुकसान व हानी प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमावाच्या हल्ल्यात अतिदक्षता विभागाची काच फुटली आणि सुरक्षा रक्षकाच्या केबिनवर काही समाजकंटकांनी दगड फेकल्याचे पोलिसांनी सांगितले. यासंदर्भात पुढील तपास करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेनंतर सकाळीच आयएमएच्या नाशिक शाखेने गंभीर दखल घेतली. जिल्हाधिकारी सूरज मांढरे तसेच पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांची त्यांनी भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिले. दोषी व्यक्तींवर कारवाई करावी आणि रुग्णालयाला चोवीस तास संरक्षण मिळावे, अशी मागणीही करण्यात आली. जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी दोेषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले, अशी माहिती आयएमए नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस यांनी दिली. कोविड हॉस्पिटल्स आणि संबंधित पोलीस ठाणे यांच्यात समन्वय साधण्यासाठी त्वरित आदेश काढण्यात येईल, असेही आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी डॉ. विशाल गुंजाळ, डॉ. अनिरुद्ध भांडारकर, राज्य कृती समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र कुलकर्णी, डॉ. शोधन गोंदकर, डॉ. सारिका देवरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
कोट...
रुग्णालयात १५ एप्रिल राेजी रोशन घाटे हा रुग्ण दाखल झाला होता. त्यावर प्लाझ्मा थेरपीपासून सर्वतोपरी उपचार करून कोरोनामुक्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु दुर्दैवाने त्यात यश आले नाही.
- डॉ. राज नगरकर, मानवता रुग्णालय
कोट...
रुग्णालयातील तोडफोडीशी नगरसेविका प्रियांका घाटे यांचा कोणताही संबंध नाही. रुग्णालयात झालेली तोडफोड आणि दगडफेकीसंदर्भात करण्यात आलेले आरोप अत्यंत चुकीचे आहेत. रुग्णालयाची बाजू सावरण्यासाठी तसेच चुकांकडे दुर्लक्ष करण्यासाठी हे आराेप करण्यात येत आहेत.
- किशोर घाटे, सामाजिक कार्यकर्ते