नाशिक : विहितगावापासून काही अंतरावर मळे भागात एका अर्धवट गृहप्रकल्पाच्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात वाढलेल्या रानगवताच्या साम्राज्यात वनविभागाने दहा ते बारा दिवसांपुर्वी लावलेल्या पिंजऱ्यात एक प्रौढ बिबट्या सोमवारी (दि.२३) सकाळी जेरबंद झाला. यामुळे विहितगाव, बेलतगव्हाण, वडनेर शिवरस्त्याच्या परिसरातील मळे भागात राहणाऱ्या वस्तीवरील लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
देवळाली कॅम्प, वडनेररोड, विहितगाव या भागात बिबट्यांचा संचार आहे. यापुर्वीही बिबट्याने या भागातील मळे परिसरात नागरिकांना दर्शन दिले आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते. नागरिकांच्या मागणीनुसार वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी पिंजरा लावण्याचे आदेश दिले होते. यानुसार दहा ते बारा दिवसांपुर्वी या ठिकाणी वनकर्मचाऱ्यांनी पाहणी करुन पिंजरा तैनात केला. बिबट्या या भागात येऊन फिरुन जात होता; मात्र पिंजऱ्यात बिबट्या येत नव्हता. वनकर्मचाऱ्यांनी वारंवार पिंजऱ्याची पाहणी करुन दिशा बदलत त्यामधील सावजही बदलले. सोमवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने भक्ष्याच्या शोधात पिंजऱ्यात प्रवेश करताच अडकला.
सकाळी नऊ वाजेच्या सुमारास या गृहप्रकल्पाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक व काही मजुूर गेले असता त्यांना पिंजऱ्यातून गुरगुरण्याचा आवाज आल्याने त्यांनी जवळ जाऊन बघितले असता बिबट्याने डरकाळी फोडली. त्यांनी याबाबत तत्काळ पोलीस पाटलाला माहिती दिली. त्यानंतर वनविभागाला माहिती मिळताच त्वरित पश्चिम वनविभागाचा लवाजमा घटनास्थळी पोहचला. बिबट्या जेरबंद झालेला पिंजरा ताब्यात घेत सुरक्षितरित्या हलविला. तीन दिवसांपुर्वीच चांदगिरी गावाच्या शिवारातून एक बिबट्या (मादी) जेरबंद करण्यात आला होता.महिनाभरापुर्वी विहितगावात केली होती 'एन्ट्री'मागील महिन्यात विहितगावात वालदेवी नदीकाठालगतच्या लोकवस्तीत बिबट्याने हजेरी लावत धुमाकूळ घातला होता. यावेळी एक पोलीस कर्मचारी बिबट्याने पंजा मारल्याने जखमीही झाला होता. या ठिकाणापासून सुमारे दोन ते अडीच किलोमीटरच्या अंतरावर सोमवारी लॅमरोडला लागून असलेल्या शिवरस्त्याच्या परिसरात बिबट्या जेरबंद झाला. यामुळे विहितगावात रहिवाशी भागात येणारा कदाचित हाच बिबट्या असावा अशी चर्चा परिसरात सुरु होती.