नाशिक : वनविभागाच्या जागेत करण्यात आलेले व्यावसायिक अतिक्रमण काढण्यात येऊ नये, यासाठी १ लाखाची लाचेची मागणी करत तडजोडअंती २० हजारांची लाच स्वीकारताना नाशिक वनपरिक्षेत्राच्या सातपुर वनपरिमंडळ अधिकारी संशयित शैलेंद्र झुटे (वनपाल) आणि संशयित वनरक्षक साहेबराव महाजन यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि.२१) रंगेहात जाळ्यात घेतले. यामुळे पुन्हा एकदा वनविभागाच्या प्रतिमेला धक्का लागला आहे.
नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्ट लोकसेवकांवर कारवाईचा दणका सुरूच ठेवला आहे. नाशिक परिक्षेत्राच्या अधीक्षक शर्मीष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आलेल्या तक्रार अर्जाची पडताळणी करत दखल घेऊन सापळा कारवाई वनाधिकारी, कर्मचाऱ्यावर मंगळवारी सातपुर भागात करण्यात आली. संशयित शैलेंद्र आनंद झुटे (४८) यांनी अवघ्या दोन ते तीन महिन्यांपुर्वीच सातपुर वनपरिमंडळाची सुत्रे स्वीकारली होती. त्यांनी वनरक्षक संशयित साहेबराव महाजन (५४) यांच्यासोबत संगनमत करून तक्रारदार हॉटेल व्यावसायिकाकडे तब्बल १ लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडअंती ६० हजारांची मागणी केली होती.
यामध्ये पुन्हा तडजोड करत ३० हजारांची मागणी करून त्यापैकी २० हजारांची लाचेची रक्कम स्वीकारली असता दोघांना रंंगेहात सातपुर वनपरिमंडळ कार्यालयाच्या आवारात जाळ्यात घेण्यात आले. या दोघांनी तक्रारदाराला कारवाईचा धाक दाखवून ‘तुम्ही मागील १० वर्षांपासून शासकिय जागेत अतिक्रमण केले आहे...’ असे सांगून कारवाईची भीती दाखवून १ लाख रुपयांची प्रथम लाच मागितली होती, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली. तक्रारदाराने यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे संपर्क साधून तक्रार दिली.
अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली सापळा अधिकारी पोलीस निरिक्षक नितीन पाटील यांच्या पथकाने सापळा रचला. त्यांच्यावर करण्यात आलेल्या अटकेच्या कारवाईची माहिती वनविभागाचे सक्षम अधिकारी उपवनसंरक्षक पश्चिम वनविभाग कार्यालयाला कळविण्यात आली आहे. दोघांविरूद्ध रात्री उशीरापर्यंत सातपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.