सुरगाणा : शहरासह तालुक्यात अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा असून, अद्याप एकही मोठा पाऊस झाला नसल्याने मोठेच काय; पण अगदी लहान ओहळांनादेखील पाणी उतरले नसल्याने सध्या तरी कमकुवत फरशी पुलांना धोका निर्माण झाला नाही. सुरगाणा येथील स्मशानभूमीजवळील आमटी नदीवर अंदाजे सत्तरच्या दशकात बांधकाम करण्यात आलेला मोठा पूल वरून सुस्थितीत दिसत असला तरी खालील बाजूने स्लॅपमधील गज उघडे पडल्याने हा पूल कमकुवत होत चालला असल्याचे व नवीन बांधकाम न केल्यास धोकादायक ठरू शकणार असल्याचे बोलले जात आहे. याच पुलावरून शहरात प्रवेश करताना हायस्कूलजवळ आणखी एक पूल आहे. हा पूलदेखील कमकुवत झाल्याने गेल्या वर्षी पाडण्यात आला होता. जवळपास वर्षभरात पुलाचा स्लॅब व भराव पूर्ण झाला आहे. मात्र लॉकडाऊन सुरू झाल्याने संरक्षक कठड्यांचे काम अजूनही बाकी असल्याने पूल सुरू करण्यात आला नाही. अजून पावसाने हवी तशी हजेरी लावली नसल्याने संरक्षण कठडे बांधून हा पूल लवकर सुरू करण्याची अपेक्षा केली जात आहे. मोठा पाऊस झाल्यास डायव्हर्शन वाहून जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पावसाळा संपल्यानंतर स्मशानभूमी जवळील पूल पाडल्यानंतर त्याचे बांधकाम पुढचा पावसाळा सुरू होण्याच्या आधीच पूर्ण करावा, अशी मागणी होत आहे.
आमटी नदीवरील पन्नाशी गाठलेला पूल जीर्णावस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 9:52 PM