ठेंगोडा : येथील गिरणा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाचे संरक्षक कठडे एकाच आठवड्यात तीन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी पडले. सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्परता दाखवत दोन वेळेस पडलेले कठडे त्वरित बांधले; मात्र तिसऱ्यांदा पुन्हा ते पडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.येथील गिरणा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल महाड दुर्घटनेनंतर संबंधित विभागाने या पुलावरील वाहतूक बंद केली होती; मात्र काही दिवसांनंतर पूल चांगला आहे, असे सांगत पूल वाहतुकीसाठी पुन्हा खुला केला होता. गेल्या आठवडाभरात या पुलाचे संरक्षक कठडे पडल्याचे लक्षात येताच संबंधित विभागाने तत्काळ त्याची डागडुजी केली. मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा वेगळ्या ठिकाणी संरक्षक कठडा तुटल्याची घटना घडली. दुसऱ्या दिवशीही संबंधितानी पुन्हा कठड्याचे बांधकाम केले. त्यानंतर पुन्हा दोन दिवसात तिसऱ्या ठिकाणी संरक्षक कठडा मोठ्या प्रमाणात पडल्याचे दिसून आले. मात्र यावेळी कठडा पडून तीन दिवस उलटूनही संबंधित विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान, पुलाच्या संरक्षक कठडा पडण्याचे सत्र सुरू झाले. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता सोनार यांना विचारणा केली असता सदर पुलाचे कठडे अचानक पडू लागणे आश्चर्याची बाब असून, सदर कृत्य कुणी तरी जाणूनबुजून करत असल्याचा संशय निर्माण झाला असल्याने याबाबत आम्ही सटाणा पोलीस स्टेशन व वरिष्टांना कळविले असल्याचे सांगितले. संरक्षक कठडे पडण्याच्या अशा घटनेमुळे मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची संभावना व्यक्त होत आहे. सदर पूल विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गास जोडला असल्याने पुलावरून मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वर्दळ असते.त्याचबरोबर लोहोणेर येथील जणता विद्यालयात जाणारे शालेय विद्यार्थी व पादचारीही मोठ्या प्रमाणात दळणवळणासाठी पुलाचा वापर करतात. (वार्ताहर)
आठवड्यात तीनदा तुटले ब्रिटिशकालीन पुलाचे कठडे
By admin | Published: September 16, 2016 10:27 PM