नाशिक : ब्रिटिश शासनाकडून इंजिनिअरिंग आणि वाहन क्षेत्रातील गुंतवणुकीला प्राधान्य दिले जात असून, या संधीचा लाभ नाशिकच्या उद्योजकांनी घ्यावा, असे आवाहन ब्रिटिश कौन्सिलच्या व्यवसाय विभागाचे उपसंचालक टॉम मॉटरशेड यांनी नाशिकमधील विविध औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी आणि उद्योजकांसमवेत झालेल्या बैठकीप्रसंगी व्यक्त केले.यावेळी बोलताना टॉम यांनी इंग्लंड हा उत्पादन क्षेत्रातील जगातील ९व्या क्रमांकाचा निर्यातदार देश आहे. तसेच भारतासमवेतच्या पहिल्या पाच गुंतवणूकदार राष्टÑांमध्ये इंग्लंडचा समावेश आहे. उत्पादन क्षेत्रात इंग्लंडकडून २७ लाख लोकांना थेट नोकऱ्यादेखील उपलब्ध झाल्या असल्याचे त्यांनी नमूद केले. त्याशिवाय ब्रिटनकडून वाहन उद्योगातील संशोधनालादेखील मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जात आहे. त्याशिवाय रोबोटिक्स, सेन्सर्स, कंट्रोल्स, थ्रीडी प्रिंटिंग या इंजिनिअरिंग उत्पादन क्षेत्रातही मोठी झेप घेतली असल्याचे टॉम यांनी नमूद केले. गुंतवणूक विभागाचे सचिव विल्यम हॉफकिन्सन यांनीदेखील गुंतवणुकीकडे संधीच्या नजरेतून पाहण्याचे आवाहन केले. यावेळी निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी आणि हर्षद ब्राह्मणकर यांनीदेखील मनोगत व्यक्त केले.गत दहा वर्षांमध्ये ब्रिटनच्या संशोधन विभागाकडून झालेल्या निधी खर्चात सुमारे २१० टक्के वाढ झाली असून, त्यातून संशोधनाला आपण किती महत्त्व देतो, ते दिसते. इंग्लंडमध्ये सर्व कार या प्रदूषणविरहित आणि हलक्या वजनाच्या करण्याला प्राथमिकता देण्यात आली असल्याचेही टॉम यांनी नमूद केले.
ब्रिटनकडून वाहन क्षेत्रात गुंतवणुकीला प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 12:03 AM