नामदेव भोर नाशिकमुंबई-गोवा महामार्गावर महाड पोलादपूर दरम्यानचा सावित्री नदीवरचा पूल वाहून गेल्याने झालेल्या दुर्घटनेमुळे नाशिकमधील ब्रिटिशकालीन पूलही चर्चेत आले आहेत. शहरात विविध ठिकाणी १०० वर्षांहून अधिक वयोमान असलेले पूल असून, या पुलांच्या सुरक्षेविषयी नागरिक चिंता व्यक्त करीत आहेत. शहरात गोदावरी नदीवर अहल्याबाई होळकर पूल (व्हिक्टोरिया पूल), नाशिक-पुणे महामार्गावरचा दारणा नदीवरील पूल व वालदेवी नदीवरील नाशिकरोड आणि देवळाली कॅम्प या उपनगरांना जोडणारा पूल आदि ब्रिटिशकालीन पूल चर्चेत आले आहेत. यातील होळकर पूल व वालदेवी पुलाला पर्यायी समांतर पूल तयार करण्यात आले असले तरी नाशिक-पुणे महामार्गावरील दारणा नदीवरील पुलाला समांतर पूल तयार करण्याचे काम अजूनही सुरू आहे. अशा परिस्थितीत पळसे आणि चेहेडी गावांच्या मध्ये असलेला हा पूल नाशिक व पुण्यासारख्या महानगरांना जोडणारा एकमेव दुवा आहे. माळेगाव व मुसळगाव औद्योगिक वसाहतींसह संपूर्ण सिन्नर तालुक्यातील नागरिकांसाठी नाशिकला येण्या-जाण्यासाठी हाच मार्ग आहे. या पुलाच्या कठड्याचा काही भाग कोसळलेला असून, पुलावर मोठमोठे खड्डे आहेत. अशा स्थितीत जिल्ह्णात दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे गोदावरी आणि दारणेने रुद्रावतार धारण केला असतानाच महाड येथे मंगळवारी रात्री सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याची बातमी समजल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने या पुलाची विशेष काळजी घेण्याची अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
शहरातील ब्रिटिशकालीन पूलही चर्चेत
By admin | Published: August 04, 2016 1:21 AM