नाशिक : बँकेतून पैसे काढून परतलेल्या कारचालकाचे लक्ष विचलित करून पल्सर दुचाकीवरील दोघा संशयितांनी कारची काच फोडून एक लाख रुपये ठेवलेली बॅग पळवून नेल्याची घटना बुधवारी (दि़२२) दुपारच्या सुमारास टिळकरोडवरील बँक आॅफ महाराष्ट्रसमोर घडली़ या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामदास रहाडे यांनी दुपारच्या सुमारास त्र्यंबकरोडवरील एका बँकेतून एक लाख रुपयांची रोकड काढली़ यानंतर रहाडे व त्यांच्यासोबत असलेल्या महिला हे झेन कारने (एमएच १५ बीडी ३९३४) टिळकवाडीत आले़ दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कारमधील महिला या ज्यूस पिण्यासाठी गेल्या़ तर त्र्यंबकरोडपासून त्यांच्या मागावर असलेल्या दुचाकीवरील दोघा संशयितांनी महिलांनी तुम्हाला बोलावल्याचा निरोप दिला़ रहाडे या कारमधून उतरून दुकानाकडे गेल्या असता काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवर असलेल्या दोघा संशयितांपैकी पाठीमागे बसलेल्या संशयिताने त्याच्याजवळील बॅगने कारच्या डाव्या बाजूची काच फोडली़ यामुळे मोठा आवाजही झाला, मात्र आवाज नेमका कुठून आला याचा अंदाज नागरिकांना आला नाही़ ही संधी साधून या संशयितांनी कारमधील एक लाख रुपये व कागदपत्रे असलेली बॅग उचलून रामायण बंगल्यापासून शरणपूररोडच्या दिशेने पळ काढला़ रहाडे यांना दुचाकीवरील दोघांचा संशय आल्याने तसेच त्यांनी त्यांच्याकडील बॅग पाहताच आरडाओरड केली़ तर काही तरुणांनी दुचाकीस्वारांचा पाठलाग करण्याचाही प्रयत्न केला मात्र ते फरार झाले़ या संशयितांचा पाठलाग करणाऱ्यांनी चोरट्यांची काळी पल्सर दुचाकी असून तिचा नंबर एमएच १६, ६५५४ असल्याचे पोलिसांना सांगितले़ दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे हे घटनास्थळी दाखल झाले़ त्यांनी शहरात नाकाबंदी करण्याच्या सूचनाही दिल्या़; मात्र चोरट्यांना पकडण्यात यश आले नाही़ (प्रतिनिधी)
कारची काच फोडून लाखाची रोकड पळविली
By admin | Published: March 23, 2017 1:26 AM