-----
सिडको : वयोवृद्ध घर मालकिणीकडून थकीत घरभाड्याच्या सहा हजारांची वारंवार होणाऱ्या मागणीचा मनात राग धरून भाडेकरू दांपत्याने दोन साथीदारांच्या मदतीने वृद्धेची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना चुंचाळे भागात घडल्याचे गुरुवारी(दि.१५) उघडकीस आले.
चुंचाळे येथील दत्तनगर भागातील माऊली चौकात राहणाऱ्या जिजाबाई पांडुरंग तुपे (६८) यांच्या मालकीच्या लहान तीन खोल्या एकमेकांना लागून आहे. त्यांनी एका खोलीत नीलेश हनुमंत शिंदे (२१) व त्याची पत्नी दीपाली नीलेश शिंदे (१९) यांना भाडेकरू म्हणून ठेवले होते. एक लहान खोली रिकामी होती आणि एका खोलीत त्या स्वतः राहत होत्या. सहा हजार रुपये घरभाडे थकल्याने तुपे यांनी शिंदे दांपत्याकडे ती रक्कम लवकरात लवकर देण्याचा तगादा लावला होता. यामुळे त्यांच्यात काही दिवसांपूर्वी खटकेही उडाले होते. मूळ अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील रहिवासी असलेल्या या पती-पत्नीने संगनमताने घरमालकीन तुपे यांच्या हत्येचा कट रचला आणि संशयित मंगेश बाळू कदम (१९) आणि विष्णू अंकुश कापसे (१९, दोघे रा.विल्होळी) यांना काहीतरी आमिष दाखवून बोलावून घेतले. या दोघांच्या मदतीने शिंदे दांपत्याने तुपे यांचा काटा काढल्याचे पोलिसांनी सांगितले.
तुपे यांचा संशयित नीलेश त्याची पत्नी दीपाली आणि साथीदार मंगेश, विष्णू यांनी दोरीच्या साह्याने गळा आवळून ठार मारले. यानंतर तुपे यांच्या अंगावरील दागिने काढून घेत त्यांचा मृतदेह छिन्न-विच्छिन्न करत एका पोत्यात भरून रिकाम्या खोलीत डांबून ठेवल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या असून अंबड पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-----इन्फो----
काही तासांत खुनाचा उलगडा
वरीष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांनी घटनेची माहिती मिळताच पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोत्यामध्ये वृद्ध महिलेचे प्रेत गळ्याला दोरी आवळून टाकण्यात आल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान या खुनाबद्दल आजूबाजूला चौकशी केली असता जिजाबाई यांच्या खोलीत भाड्याने राहणारा भाडेकरू हा मंगळवार (दि.१३) हा पत्नीला घेऊन रात्रीपासून फरार झाल्याची माहिती मिळाली. दरम्यान अंबड पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, किरण गायकवाड, मुकेश गांगुर्डे, हेमंत आहेर यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार अकोले गाठले. तेथून या दोघा पती-पत्नीला ताब्यात घेऊन अंबड पोलीस ठाण्यात आणले. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच सहा हजारांचा तगादा घरमालकिणीने लागवल्याने त्याचा राग येऊन दोघा साथीदारांच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली.
-----इन्फो----
मंगळवारी रात्रीपासून जिजाबाई झाल्या गायब
येथील शेजारी राहणाऱ्या एक महिलेच्या घरात जिजाबाई मंगळवारी रात्री ९ वाजेपर्यंत बसून गप्पा करत होत्या. त्यानंतर त्या त्यांच्या घरी निघून गेल्या; मात्र त्यानंतर त्या कुणाला दिसून आल्या नाही. आजूबाजूच्या रहिवाशांनी जिजाबाई यांचा शोध घेत एकमेकांना विचारपूसही केली होती.