सामनगावरोड येथील गाडेकर मळ्यात सुनील गाडेकर यांच्या खोलीमध्ये भाडेकरू म्हणून लालबाबू सीताराम यादव हे आपल्या पत्नी, दोन मुलगे व मुलीसह राहतात. मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास यादव यांच्या घराशेजारी राहणारा संशयित युवक विशाल विष्णू गेजगे याने घरमालक गाडेकर यांची राखाडी रंगाची ओम्नी मारुती व्हॅन (क्र.एमएच०२ एमए ९७९५) भाजीपाला देण्याकरिता घेतली. विशालने शेजारी राहणारा नऊ वर्षाचा लालबाबू यांचा मुलगा रामजीला सोबत घेतले. नाशिकरोड रेल्वेस्थानक येथील पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या स्वप्नील वसंत सोनवणे (रा. गाडेकर मळा, सामनगावरोड) या मित्रालाही विशालने ओम्नीमध्ये सोबत घेतले.
पुढे सिन्नर फाटा येथे सिन्नरला जाणाऱ्या एका प्रवाशालाही त्यांनी कारमध्ये बसविले. यानंतर त्यांनी गाडी सामनगाव-एकलहरा रस्त्याने नेली. तेथे प्रवासी विजय अनिल आव्हाड (२६, केपानगर, सिन्नर) यांना बेदम मारहाण करत शस्राचा धाक दाखवून जबरी लूट करत जखमी करून पळ काढला. हा सगळा प्रकार रामजीसमोर घडला आणि त्या अल्पवयीन मुलाने हे सगळे मी वडिलांना सांगणार असल्याचे सांगितले. यानंतर दोघांनी त्याच्या खुनाचा कट रचत गळा आवळला.
मध्यरात्रीच्या सुमारास विशाल मारुती कार घेऊन पुन्हा त्याच्या घरी आला असता रामजीच्या आईवडिलांनी मुलाबाबत विचारणा केली. विशालने मुलाला केव्हाच गाडेकर मळ्यातील मंदिराकडे सोडल्याचे सांगितले. यावरून त्यांच्यात वाद झाला. माता-पित्यांनी थेट नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेत सर्व हकीकत कथन केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्वरित विशालला त्याच्या घरातून ताब्यात घेत तपासाला गती दिली. त्याला खाकीचा हिसका देताच त्याने त्याचा साथीदार स्वप्नीलच्या मदतीने दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली.
---इन्फो---
चार दिवसांची पोलीस कोठडी
विशाल व स्वप्नील यांनी त्यांच्या जबरी लुटीचे बिंग फुटू नये, म्हणून अल्पवयीन निष्पाप मुलाचा गळा आवळून खून केल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यानंतर विशाल याने रामजीचा मृतदेह डुबेरे-वडगाव रोडवर असलेल्या बंधाऱ्याच्या छोट्या पुलावरून पाण्यात फेकून देत पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी या विशाल व स्वप्नील या दोघांविरुद्ध अपहरण, खून व जबरी चोरीचा गुन्हा नाशिकरोड पोलीस ठाऱ्यात दाखल केला आहे. नाशिकरोड न्यायालयाने संशयित आरोपी विशाल व स्वप्नीलला शनिवारपर्यंत चार दिवस पोलीस कोठडी सुनावली.
---इन्फो----
खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा
अल्पवयीन रामजीचा नाहक बळी घेणाऱ्या दोघा संशयितांना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, यासाठी त्याच्या आई-वडिलांनी व नातेवाइकांनी नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्याकडे हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणी केली.
-----
फोटो आर वर ०२रामजी नावाने सेव्ह आहे.
.