नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थळी भारत संचार निगमच्यावतीने वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ३ दिवस चालणाऱ्या या संमेलनात माध्यम कक्षाची उभारणी करण्यात येणार असून तिथेही वायफाय सुविधा उपलब्ध असणार आहे.
संमेलनात भारत संचार निगमच्या वतीने साहित्य रसिकांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात येणार असून त्या ठिकाणी विविध दळणवळणाच्या सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत अशी माहिती भारतीय संचार निगमचे जनरल मॅनेजर नितीन महाजन यांनी दिली. महाजन यांनी संमेलन कार्यालयाला भेट देऊन कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करून कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. भारत संचार निगमने संमेलनाचे संदेश व संचार यंत्रणेसंदर्भातील प्रायोजकत्व स्वीकारून संमेलनात सर्व सुविधा उपलब्ध करून देत आहोत, असेही नमूद केले. यावेळी संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, कार्यालयीन प्रमुख दिलीप साळवेकर, कवी काशिनाथ वेलदोडे, संमेलनाचे कार्यवाह प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे, सुभाष पाटील, संजय करंजकर, भारत संचार निगमचे उल्हास मोराणकर, सचिन कोटकर, बालकट्टा विभागाचे संयोजक अभिजित साबळे, गीता बागुल, योगिनी जोशी आदी उपस्थित होते. यावेळी नितीन महाजन यांचा सत्कार नाटककार भगवान हिरे यांच्या हस्ते करण्यात आला. साहित्य संमेलनाच्या कार्यालयासाठी ०२५३-२३१५९०५ हा दूरध्वनी क्रमांक देण्यात असून संमेलनासाठी ५ मोबाईल क्रमांक संपर्कांसाठी देण्यात आले आहेत.